दररोज १.२५ कोटी लोकांना दिली जाते कोरोना लस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:34 AM2021-09-07T05:34:00+5:302021-09-07T05:34:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी; लसीकरणाने घेतला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात दररोज १.२५ कोटी लोकांना कोरोना लसीचे डोस दिले जातात. ही संख्या कित्येक देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, अनेक अडचणी असूनही सर्व पात्र व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सिक्कीम, दादरा-नगर हवेली यांनीही अशीच कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
हिमाचल प्रदेशमधील आरोग्यसेवकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून सोमवारी संवाद साधला, मोदी म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका बॉक्समध्ये ११ डोस असतात. ते सर्व व्यवस्थितरीत्या वापरले गेले तर लसीकरण मोहिमेवरील खर्च १० टक्क्यांनी कमी होईल.
कौतुक...
उना येथील आरोग्यसेविका करमोदेवी यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तरीही निराश न होता त्या लसीकरण मोहिमेत हिरीरीने सहभागी झाल्या आहेत. त्यांनी आजवर २२,५०० जणांना कोरोना लस दिली आहे. करमोदेवी यांच्या कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली.