कोरोना लस: फेब्रुवारी महिन्यात येणार दोन लशी, अर्ध्या किमतीत खरेदी करणार सरकार
By मोरेश्वर येरम | Published: November 23, 2020 09:38 AM2020-11-23T09:38:34+5:302020-11-23T09:43:38+5:30
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लशीला तात्काळ वापरासाठीची मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्डच्या अॅस्ट्राजेनका लशीला मान्यता केव्हा मिळते याची वाट पाहिली जात आहे.
नवी दिल्ली
देशासह संपूर्ण जगासाठी २०२० हे वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे वाईट ठरलं असलं तरी २०२१ हे वर्ष खुशखबर घेऊन येणारं ठरू शकतं. जानेवारी किंवा फेब्रवारी २०२१ मध्ये देशातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लशीला तात्काळ वापरासाठीची मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्डच्या अॅस्ट्राजेनका लशीला मान्यता केव्हा मिळते याची वाट पाहिली जात आहे. सीरमने अॅस्ट्राजेनकासोबत भागीदारी केली आहे. दुसरीकडे देशात भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लशीलाही तात्काळ मंजुरी दिली जाऊ शकते. अशाप्रकारे येत्या वर्षाच्या सुरुवातीला किंवा फेब्रुवारी महिन्यात भारतीयांना कोरोनावरील दोन लशी उपलब्ध होऊ शकतात.
जानेवारीत उपलब्ध होऊ शकते 'कोविशील्ड'
सीरम इंस्टिट्यूट डिसेंबर महिन्यात भारतीय नियामक प्राधिकरणाकडे कोविशील्डच्या तात्काळ मंजुरीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. 'सारंकाही ठरलेल्या योजनेनुसार झालं आणि कंपनीला डिसेंबर महिन्यातच मंजुरी मिळाली तर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात भारतीयांना लशीची पहिली खेप आम्ही उपलब्ध करुन देऊ शकतो', असं सीरमच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. सीरमच्या लशीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देखील जवळपास पूर्ण केली आहे आणि त्याची माहिती लवकरच हाती येण्याच्या मार्गावर आहे. भारतात ही लस 'कोविशील्ड' नावाने उपलब्ध होणार आहे.
'कोवॅक्सीन'लाही मिळू शकते तात्काळ मंजुरी
भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सीन'लाही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील माहिती सादर केल्यानंतर तात्काळ मंजुरी दिली जाऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, कोवॅक्सीनची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असून सध्या लशीच्या परिणामांची माहिती जमा केली जात आहे. त्यामुळे येत्या वर्षात मार्च अखेरपर्यंत देशात कोरोनाला मात देणाऱ्या एकापेक्षा अधिक लशी उपलब्ध होऊ शकतात असे संकेत दिसत आहेत.
पहिल्या टप्प्यात लस कुणाला उपलब्ध होणार?
पहिल्या टप्प्यात केंद्र सरकार जवळपास २५ ते ३० कोटी लोकांना लस देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. यासाठी लशीचे जवळपास ५० ते ६० कोटी डोस उपलब्ध होणे गरजेचे आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात देशातील ७० लाख आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि अधिकारी, २ कोटींहून अधिक कोरोना योद्धे अर्थात पोलीस दल, नगर व्यवस्थापन, लष्कर इत्यादींना लस देण्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यात लस दिली जाणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
अर्ध्या किमतीत लस खरेदी करणार सरकार
केंद्र सरकार लस तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत संपर्कात आहे. मोठ्या प्रमाणावर लस खरेदी करण्यासाठी सरकारने तयारी केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सीरम इंस्टिट्यूटच्या लशीची किंमत ५०० ते ६०० रुपये इतकी असू शकते आणि सरकारला ही लस अर्ध्या किमतीत मिळणार आहे.