Corona vaccine: दुसऱ्या डोसला उशीर झाल्यास काय होईल? संशोधनातून समोर आली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 01:49 PM2021-05-21T13:49:16+5:302021-05-21T13:50:58+5:30
Corona vaccine Update: देशातील मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला अद्याप कोरोनावरील लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. लसीकरणाला होत असलेल्या उशिरामुळे वाढत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - कोरोनावरील लसींच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देशातील लसीकरणाचा वेग खूप मंदावला आहे. (Corona vaccination in India) त्यामुळे सध्या देशामध्ये अशा नागरिकांची संख्या खूप झाली आहे ज्यांना कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस मिळाला आहे. मात्र ते दुसरा डोस मिळण्याची वाट पाहत आहेत. मात्र देशातील मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला अद्याप कोरोनावरील लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. लसीकरणाला होत असलेल्या उशिरामुळे वाढत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी एक माहिती समोर आली आहे. कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर हे अधिक असेल तर ३०० टक्के अधिक अँटिबॉडी निर्माण होण्याची शक्यता असते, अशी माहिती संशोधनामधून समोर आली आहे. ( If the second dose is delayed, 300% more antibodies may be added)
ब्लूमबर्गमधील रिपोर्टनुसार लसीच्या दुसऱ्या डोसमध्ये होणारा उशीर सप्लाय आणि इम्युन सिस्टिम या दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. संशोधनामधून समजले की, जर लसीचा दुसरा डोस उशिराने प्राप्त झाला तर विषाणूसोबत लढणाऱ्या अँटिबॉडीचा स्तर २० ते ३०० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. अशा परिस्थितीत हे नवे संशोधन सिंगापूर आणि भारतासह अनेक देशांसाठी फायदेशीर ठरू शकते.
सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे येथे दोन डोसमधील अंतर ४ ते ६ आठवडे करण्यात आले आहे. त्यापूर्वी हे अंतर ३ ते ४ आठवडे एवढेच होते. दरम्यान, भारतामध्येसुद्दा लसीच्या उपलब्धतेचे आकडे योग्यप्रमाणे समोर दिसत नाही आहेत. येथेही लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा सल्ला दिला जात आहे. कमी लसी आणि अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये हे धोरण उपयुक्त ठरू शकते, असा दावा केला जात आहे.
लसीचा पहिला डोस इम्युन सिस्टिम तयार करतो आणि विषाणूविरोधात अँटिबॉडी तयार करायला सुरुवात करतो. अशा परिस्थितीत या प्रक्रियेला जेवढा अधिक वेळ मिळे तेवढी चांगली प्रतिक्रिया दुसऱ्या डोसमधून मिळते, असे संशोधनामधून समोर आले आहे. दरम्यान, लसीच्या दोन डोसमधील जास्त अंतर हे सर्वच लसींच्याबाबतीत फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे.
मात्र यामध्ये काही तोटेही दिसून आले आहे. अशा प्रकारे दोन डोसमध्ये अधिक अंतर ठेवले गेले तर संपूर्ण देशाच्या लोकसंख्येला सुरक्षित करण्यामध्ये अधिक वेळ लागू शकतो. कारण लसीच्या पहिल्या डोसमुळे काही प्रमाणात संरक्षण होते. मात्र दुसरा डोस घेऊन अनेक आठवडे लोटल्याशिवाय त्या व्यक्तीला संपूर्णपणे इम्युनाइज्ड मानले जात नाही. याशिवाय जर कमी परिणामकारक लसीचा वापर होत असेल किंवा विषाणूचे अधिक संसर्गजन्य व्हेरिएंट्स पसरत असतील तर दोन डोसमधील अधिक अंतर हे धोकादायक ठरू शकते.