Petrol Diesel Price: कोरोना लसीची चाहूल; पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आठवडाभरात मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 07:54 AM2020-11-24T07:54:05+5:302020-11-24T07:54:32+5:30
Petrol Diesel Price: ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून इंधनाच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र, सप्टेंबरपासून किंमती वाढविण्याचे बंद करण्यात आले होते.
नवी दिल्ली: कोरोना काळात 15 वर्षांपेक्षा कमी किंमतीवर गेलेले कच्च्या तेलाचे दर आता कोरोना लस येण्याची चाहूल लागताच कमालीचे वाढू लागले आहेत. 2021 मध्ये ओपेक देशांचे लक्ष्य काय असेल हे ठरविण्यासाठी 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबरला बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर 40 वरून 45 डॉलरवर पोहोचले आहेत. याचाच परिणाम गेल्या आठवडाभरापासून पहायला मिळाला असून देशातील पेट्रोलडिझेलच्या किंमती वाढू लागल्या आहेत.
2021 च्या सुरुवातालीला कच्च्या तेलाच्या किंमती या 58 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त वाढणार आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या 48 दिवसांपासून देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून या किंमती सतत वाढू लागल्या आहेत. सरकारी पेट्रोलिअम कंपन्यांनी आज पेट्रोल सहा पैशांनी वाढविले आहे. तर डिझेल 17 पैशांनी वाढले आहे. मुंबईत आज पेट्रोल 88.52 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 77.33 रुपयांवर गेले आहे.
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून इंधनाच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र, सप्टेंबरपासून किंमती वाढविण्याचे बंद करण्यात आले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या 20 डॉलरवर आल्या होत्या. दीड महिन्यांपूर्वी इंधनाच्या दरात 1.19 रुपयांची घट झाली होती. यानंतर 48 दिवसांपर्यंत किंमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. या किंमती गेल्या आठवड्यालपासून पुन्हा वाढू लागल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत पेट्रोल 53 पैशांमी महाग झाले आहे. तर डिझेलच्या किंमतीमध्ये 95 पैशांची वाढ झाली आहे.
काँग्रेसचा विरोध
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे नेते मालकीत सिंग म्हणाले की, कोरोनामुळे सामान्य जनता, वाहतूकदार आर्थिक संकटात आहेत. निवडणुकीनंतर इंधन दरवाढ करण्याचे कोणतेही वैध कारण नाही. इंधन दरवाढीमुळे इतर वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो. त्याचा फटका सामान्य व्यक्तीला बसतो. केंद्र सरकारने इंधन दरवाढ थांबवावी. याबाबत पंतप्रधान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, रस्ते वाहतूक मंत्रालय यांना पत्र पाठवल आहे.
महाराष्ट्रात 60 दिवसांनी दरवाढ
प्राप्त आकडेवारीनुसार गुरुवार, १९ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली नाही. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल वाढताच गुरुवारी मध्यरात्रीनंतर कंपन्यांनी इंधनाच्या किमती वाढविल्या. शुक्रवार, २० नोव्हेंबरला पेेट्रोल प्रति लिटर ८८.४५, डिझेल ७७.६७ रुपये विकल्या गेले. पूर्वीच्या आकडेवारीनुसार १९ सप्टेंबरला पेट्रोलचे दर ८८.३७ रुपये होते. तर २१ सप्टेंबरला ८ पैशांची घसरण होऊन ८८.२९ रुपयांवर स्थिरावले. त्यानंतर २० नोव्हेंबरला पेट्रोल १६ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी वाढले आहे.
पेट्रोल आणि डिझेल दर तक्ता
तारीख पेट्रोल डिझेल
१९ सप्टें. ८८.३७ ७८.६२
२१ सप्टें. ८८.२९ ७८.३३
२७ सप्टें. ८८.२९ ७७.७२
२८ सप्टें. ८८.२९ ७७.६४
१३ ऑक्टो. ८८.२९ ७७.४४
२० नाेव्हें. ८८.४५ ७७.६७