Corona Vaccine: ‘यूके स्ट्रेन’वरही भारताची लस प्रभावशील; खुल्या बाजारात कधी विक्री होणार?
By प्रविण मरगळे | Published: January 4, 2021 08:23 AM2021-01-04T08:23:11+5:302021-01-04T08:24:16+5:30
Corona Vaccine: अनेक राज्यात लसीकरणाचं ड्रायरन करण्यात यश आलं आहे. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत
नवी दिल्ली – कोरोनाविरुद्ध लढाई दरम्यान भारताने दोन लसींना परवानगी दिली आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला DCGI नं मंजुरी दिली आहे. देशातील वैज्ञानिकांनी कोरोना संपुष्टात आणणारी लस बनवल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून कोरोना लसीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यात ICMR चे डीजी बलराम भार्गव यांनी भारतात बनलेल्या दोन्ही लसी इतर लसींच्या तुलनेत जास्त प्रभावी आहेत असा विश्वास लोकांना दिला आहे.
बलराम भार्गव यांनी कोविशिल्ड(Covishield) आणि कोव्हॅक्सिन लसीवर उद्भवणाऱ्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत, आजतकच्या मुलाखतीत ते बोलत होते, लसीकरणाला मंजुरी दिली असून आता ती स्टोर केली जाणार आहे. अनेक राज्यात लसीकरणाचं ड्रायरन करण्यात यश आलं आहे. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, आमच्याकडे लोक आहेत ज्यांना ही लस दिली जाणार आहे. एक किंवा दोन आठवड्यात लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होईल. आरोग्य मंत्रालय मागील १६ वर्षापासून लहान मुले आणि महिलांना लस देत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण कार्यक्रमही यशस्वी करण्याची क्षमता आरोग्य विभागाकडे आहे असं त्यांनी सांगितले. (Corona Vaccine)
प्रश्न – कोव्हॅक्सिनला मंजुरी का देण्यात आली?
उत्तर – व्हायरसला ICMR ने आयसोलेट केलं होतं, त्यानंतर त्याला भारत बायोटेकला देण्यात आलं, सर्व प्री क्लीनिकल ट्रायलनंतर व्हॅक्सिन बनवण्यात आली, फेज १ आणि फेज २ ट्रायलमध्ये सुरक्षा बाळगण्यात आली, तिसऱ्या टप्प्यातील चाचणी तीन-चार दिवसात पूर्ण होईल, क्लीनिकल चाचणीदरम्यान मंजुरी देण्यात आली आहे. ज्याचा अर्थ ज्या रूग्णांना ही लस दिली जाईल त्यांचे निरीक्षण करण्यात येईल. औषध महानियंत्रक दोन्ही लसींचा डेटा तपासतील, हे एक चांगले पाऊल आहे असं आम्हाला वाटतं.
प्रश्न- एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचा वापर विशेष परिस्थितीत करेल, यावर आपण काय बोलता?
उत्तर- सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे दोन लस आहेत. आम्हाला यूकेच्या स्ट्रेनबद्दल चिंता वाटते. फायझर आणि मॉडर्ना लस त्याच्यावर प्रभावी नाहीत. म्हणूनच फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, गरज भासल्यास येत्या ६ आठवड्यात ते लसीत सुधारणा करतील, तर आमच्याकडे एक लस आहे जी यूकेच्या स्टेनवरदेखील प्रभावी असेल. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन २ ते ८ डिग्री तापमानात साठवली जाऊ शकते आणि लसीचे दोन डोस २८ दिवसांच्या आत दिले जातील.
प्रश्न- फायझर आणि मॉडर्ना लस यूके स्ट्रेनविरूद्ध प्रभावी नाहीत. त्यामुळेच भारत बायोटेकच्या लसीला मंजुरी देण्यात आली का?
उत्तर - भारत बायोटेक लस यूके स्ट्रेनवर देखील प्रभावी आहे आणि आम्ही यूके स्ट्रेनला आयोसेलेट करण्यात यशस्वी झालो आहोत. इतर कोणत्याही लसीपेक्षा कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड अधिक प्रभावी आहेत.
प्रश्न- लस बाजारात कधी येईल?
उत्तर- या लसीला आपत्कालीन वापराचा परवाना देण्यात आला आहे. सध्या, ती खुल्या बाजारात विकली जाणार नाही. पूर्ण परवाना मिळाल्यानंतर ही लस खुल्या बाजारात विकली जाईल.
प्रश्न- कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यासाठी काही शॉर्ट कट होता?
उत्तर - हा एक महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. आमच्या शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस काम केले. त्यांनी भारतात लस तयार करून चांगली कामगिरी केली आहे. आम्ही जगाला आपली शक्ती दाखवली आहे. माझ्या आणि वैज्ञानिक समुदायाच्या दृष्टिकोनातून लस मंजूर करण्यात कोणताही शॉर्ट कट वापरला गेला नाही. मग ते उंदिराच्या निरीक्षणावर असो वा माकडांवरील चाचणी किंवा टप्पा १ किंवा टप्पा २ चा अभ्यास असेल, कोणताही शॉर्ट कट नाही. दोन्ही लसींमध्ये सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. दोन्ही लस प्रभावी आहेत, म्हणूनच भारतीय नियामक आणि वैज्ञानिकांनी कोणत्याही बाबतीत शॉर्ट कट वापरला नाही.(Bharat Biotech Covaxin)
प्रश्न- भारतातील लस फायझर आणि मॉडर्नापेक्षा चांगली का आहे?
उत्तर - भारताची लस २ ते ८ डिग्री तपमानात ठेवली जाऊ शकते, परंतु फायझर आणि मॉडर्नामध्ये असे नाही. या दोन्ही लसी -१७ ते १९ अंशांवर ठेवाव्या लागतील. आमची लस इतर लसीप्रमाणे ठेवता येते.
प्रश्न- अॅस्ट्रा जेनेका म्हणतात की, जास्तीत जास्त प्रभावासाठी ८-१२ आठवड्यांचा कालावधी उत्तम आहे, मग आपण लसीचे २ डोज देण्यासाठी २८ दिवसांचा कालावधी का ठेवला आहे?
उत्तर - आमच्याकडे असलेल्या डेटाच्या आधारे अर्जावर प्रक्रिया केली जाते. डेटा भिन्न असल्यास बदल देखील केले जाऊ शकतात.
प्रश्न- ही लस ७० टक्के प्रभावी आहे. याचा अर्थ काय?
उत्तर - जगभरात कोणतीही लस १०० टक्के प्रभावी नसते. इन्फ्लूएन्झा आणि इतर रोगांच्या लसीचा प्रभावही ५०-६० टक्के आहे. लसीकरणानंतरही आपल्याला मास्क, सेनिटायझर आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल, जर आपण व्हायरसची साखळी यशस्वीपणे मोडली तर देशातील संपूर्ण लोकसंख्येस लस देण्याची गरज भासणार नाही.