Corona Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सनचा एका डोसच्या लसीचा ‘आपत्कालीन’साठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 08:25 AM2021-08-07T08:25:17+5:302021-08-07T08:26:07+5:30
Johnson & Johnson Corona Vaccine: अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने आपल्या एका डोसच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने आपल्या एका डोसच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. याआधीही सदर कंपनीने असा अर्ज केला होता. मात्र आता मान्यताप्राप्त लसींसाठी चाचण्यांची अट केंद्राने दूर केली असल्याने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला थेट मंजुरीसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. यासंदर्भात या कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळविण्याबाबतचा अर्ज औषध महानियंत्रकांकडे ५ ऑगस्ट रोजी सादर करण्यात आला. ही लस बायोलॉजिकल-ई या कंपनीच्या मदतीने भारतात व जगात वितरित करण्यात येणार आहे. गावी व कोवॅक्स यांनाही आमच्या लसी पुरविणार आहोत. आतापर्यंत देशात कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक व्ही, मॉडेर्ना या चार लसींना आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी मान्यता दिली आहे.
लसीकरणाचा खर्च कमी होण्याची शक्यता
जॉन्सन अँड जॉन्सनच्या एका डोसची लस जर लोकांना देण्यात आली तर लसीकरणावरील खर्च लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच या लसीची परिणामकारकता मोठी असल्याने त्याचा नागरिकांनाही फायदा मिळेल. अशा दुहेरी गोष्टींमुळे जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी कधी मंजुरी मिळते याकडे वैद्यकीय तज्ज्ञांचेही डोळे लागून राहिले आहेत.