Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर पडणार भारी; Covishield, Covaxin लसीच्या मिश्रणाची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 09:01 AM2021-08-12T09:01:05+5:302021-08-12T09:04:22+5:30
अमेरिका, यूकेसह काही देशांमध्ये याआधीच विविध लसींच्या मिश्रणाची चाचणी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसच्या दोन लसींचे कॉकटेल करण्याची चाचणी सुरु झाली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI) नं यासाठी मंजुरी दिली आहे. चाचणीत कोविशील्ड(covishield) आणि कोव्हॅक्सिन(covaxin) लसीचे एक एक डोस दिले जातील. त्याचा लोकांवर काय परिणाम होतो याचा आढावा घेतला जाईल. भारतात ही पहिली स्टडी आहे.
अमेरिका, यूकेसह काही देशांमध्ये याआधीच विविध लसींच्या मिश्रणाची चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी नेमकी कशी असेल आणि त्याचे फायदे काय होतील याबाबत जाणून घेऊया. सध्या तामिळनाडू येथील क्रिश्चियन मेडिकल कॉलेजला लसीच्या मिश्रणाची चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ३०० आरोग्य स्वयंसेवकांना कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे एक एक डोस दिले जातील. या ग्रुपला दोन गटात विभागलं आहे. पहिल्या ग्रुपला कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येईल तर दुसऱ्या ग्रुपला कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात येईल. दुसरे डोस वेगळे देण्यात येतील.
लसीचं मिश्रण कधी करतात? या चाचणीत काय होणार?
कोविड १९(Covid 19) च्या पहिल्या अनेक स्टडीत समोर आलंय की, लसीचं मिश्रण केल्यास इम्युनिटी वाढतेय. सामान्यत: लसीच्या मिश्रणाने विविध व्हेरिएंटविरोधात लढण्याची क्षमता वाढते. कोव्हॅक्सिन एक इनएक्टिवेटेड होल व्हायरस व्हॅक्सिन आहे तर कोविशील्ड एडेनोवायरस प्लॅटफोर्म आधारित व्हॅक्सिन आहे.
तज्ज्ञांच्या मते, कोविशील्ड केवळ एँटी स्पाइक प्रोटीन रेस्पॉन्स ट्रिगर आहे. बूस्टर म्हणून कोव्हॅक्सिन यूज केल्यानं तो रेस्पॉन्स आणखी मजबूत होतो आणि सर्व SARS-Cov-2 प्रोटीन्सविरोधात चांगली रोगप्रतिकार शक्ती तयार होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) दोन डोससाठी एकाच लसीचा उपयोग केला पाहिजे. चुकून दुसरा डोस दिला गेला तर कुठल्याही व्हॅक्सिनचा अतिरिक्त डोस घेण्याची गरज नाही.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR)ने एका स्टडीनंतर म्हटलंय की, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनच्या मिश्रणामुळे कोविडविरोधात चांगली इम्युनिटी तयार होते. डि. व्हिके पॉल म्हणतात की, वैज्ञानिकांच्या दृष्टीकोनातून असं केले जाऊ शकते. परंतु त्यासाठी रिसर्च गरजेचा आहे. डोसचं मिश्रण केले पाहिजे असं ठोसपणे सांगता येऊ शकत नाही.
लसीच्या मिश्रणाचे फायदे काय?
काही रिसर्चमध्ये दावा केलाय की, मिश्रण केल्याने कोरोना व्हायरसविरोधात जास्त सुरक्षा मिळते. मिश्रण केलेले डोस व्हायरसच्या विविध भागांवर हल्ला करतात. इम्युनिटी सिस्टम तयार होते. त्यामुळे नव्या व्हेरिएंटविरोधातही सुरक्षा मिळू शकते. लसीचे मिश्रण करण्याचा सर्वात मोठा फायदा की, लसीच्या तुटवड्याचा प्रश्न सुटेल. सध्या देशात लसींचा अभाव आहे. त्यामुळे दोन लसींचे डोस मिश्रण केल्यास त्याचा फायदा होऊ शकेल. भारतात दोन लसींच्या मिश्रण वापरण्यास परवानगी मिळाली तर देशात लसीकरण मोहिमेला वेग येईल.
जगात लसीच्या संमिश्र डोसचे नियम काय?
अनेक पाश्चिमात्य देशात फायजर, मॉडर्ना आणि एस्ट्राजेनेका लसीचे मिश्रण केले जात आहे. कॅनडात लसीचा पहिला डोस फायजरचा आणि नंतर मॉडर्ना लसीचा डोस देण्यात येतो. अमेरिकेत आपत्कालीन परिस्थितीत फायजर बायोएनटेक लस आणि मॉडर्ना लस २८ दिवसांच्या काळात मिश्रण करण्याची परवानगी आहे. यूकेमध्ये सध्या मिश्रण असलेल्या लसीचे डोस दिले गेले आहेत. त्यावर चाचणी सुरू आहे. त्याशिवाय चीन, रशिया, नॉर्वे, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडनसारख्या अनेक देशात लसीच्या मिश्रणाला मंजुरी मिळून त्यावर चाचणी सुरू आहे.