Corona Vaccine : मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोरोना लसीकरणाचं सर्टिफिकेट मिळालं पण लस नाही; धक्कादायक प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 12:25 PM2021-09-29T12:25:51+5:302021-09-29T12:33:01+5:30
Modis birthday many got vaccine certificates but not vaccines : मोदींच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये काही ठिकाणी गडबड झाल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान देशात लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी देशभरामध्ये झालेल्या विक्रमी लसीकरणा प्रश्नचिन्हं उपस्थित करणारी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये काही ठिकाणी गडबड झाल्याचं समोर आलं आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोरोना लसीकरणाचं सर्टिफिकेट मिळालं पण प्रत्यक्षात लस घेतलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. द कारवान या मासिकाच्या रिपोर्टमधून याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.
रिपोर्टमध्ये देशभरामधील वेगवेगळ्या राज्यांमधील लोकांचे अनुभव सांगण्यात आले आहेत. अनेकांनी 17 सप्टेंबरच्या आधी लस घेतल्यानंतर त्यांना 17 सप्टेंबर रोजी सर्टिफिकेट देण्यात आलं तर काहींना दुसऱ्या लसीचा डोस न घेताच 17 तारखेला डोस देण्यात आल्याचं सर्टिफिकेट पाठवण्यात आलं आहे. याचसंदर्भात स्क्रोलने दिलेल्या वृत्तानुसार बिहारमधील अनेक ठिकाणी लोकांना 15 आणि 16 सप्टेंबर रोजी लस देण्यात आली असली तरी कोविनच्या पोर्टलवर त्यासंदर्भातील माहिती 17 सप्टेंबरला अपलोड करण्यात आली. कोविनवरील माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरामध्ये अडीच कोटी डोस देण्यात आले.
I have not visited any vaccination center yesterday. How come i got this message without being vaccinated.. Today i have visited Mendarda CHC today for second dose of vaccine and inquired for the same and you can see what kind of irresponsible reply i received from the concerned
— Tushar Vaishnav (@VaishnavTushar8) September 18, 2021
"लस न घेताच लस घेतल्यासंदर्भातील सर्टिफिकेट मिळालं"
देशभरामध्ये मात्र त्यानंतर पुढील सात दिवसांमध्ये रोज जवळपास 76 लाख लसी दिल्या जात असल्याचं कोविनवरील डेटावरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळेच 17 सप्टेंबर रोजीच्या लसीकरण रेकॉर्डवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुजरातमधील हुसैन बाजी यांना 17 सप्टेंबर रोजी लस न घेताच लस घेतल्यासंदर्भातील सर्टिफिकेट मिळालं. गुजरातमधील दाहोदमधील लसीकरण केंद्रावर त्यांनी लस घेतल्याचं दाखवण्यात आलं. "आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी वडोदऱ्यामध्ये काही दिवसांपूर्वी लसीचा दुसरा डोस घेतला होता. मात्र प्रमाणपत्रामध्ये मी माझ्या मूळ गावी डोस घेतल्याचं दाखवण्यात आलं, पण मी त्या दिवशी गावी नव्हतोच" असं बाजी यांनी म्हटलं आहे.
"लस न घेता सर्टिफिकेट मिळालेले 5 लोक तक्रार करण्यासाठी दाखल"
गुजरातमधील केशोद येथे राहणाऱ्या तुषार वैष्णव आणि त्यांच्या पत्नीलाही 17 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता तुमचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे असं सांगणारा मेसेज आहे. "मला आधी हा मेसेज चुकून आल्याचं वाटलं. मात्र सर्टिफिकेटवर आमच्या दोघांचीही नावं होतं. तेव्हा मला काही कळलं नाही" असं तुषार यांनी सांगितलं. तसेच तुषार यांच्या घरापासून 25 किलोमीटरवर असणाऱ्या लसीकरण केंद्रामध्ये लस देण्यात आल्याचं या सर्टिफिकेटवर म्हटलं असून एवढ्या दूर जाऊन आम्ही कशाला लस घेऊ असंही तुषार म्हणाले. यासंदर्भात तुषार यांनी 18 सप्टेंबर रोजी संबंधित केंद्राला भेट दिली असता त्या ठिकाणी त्यांना अशाच प्रकारे लस न घेता सर्टिफिकेट मिळालेले पाच लोक तक्रार करण्यासाठी आल्याचं समजलं. मात्र या केंद्रावर असणाऱ्या नर्सने तक्रार ऐकून घेण्यास नकार दिला.
"शांत राहा आणि वाटेल तेव्हा केंद्रावर येऊन लस घेऊन जा"
बिहारमधील राजू कुमार यांच्यासोबतही असाच प्रकार घडलाय. हिलसा येथे राहणाऱ्या कुमार यांना 15 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून फोन आला आणि तुम्ही या आठवड्यामध्ये कधीही लसीचा दुसरा डोस घेऊ शकता असं सांगण्यात आलं. "17 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता कुमार यांना एक नोटीफिकेशन आलं ज्यात त्यांनी लस घेतल्याचं सांगण्यात आलेलं. मात्र त्यांना सर्टिफिकेट डाऊनलोड करता येत नव्हतं" असं म्हटलं आहे. यानंतर कुमार यांनी केंद्रावर फोन केला असता त्यांना शांत राहा आणि वाटेल तेव्हा केंद्रावर येऊन लस घेऊन जा असं सांगण्यात आल्याचं रिपोर्टध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.