Corona Vaccine: नेसल स्प्रे भारतात कोरोनापासून संरक्षण देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 04:40 AM2021-04-21T04:40:46+5:302021-04-21T04:40:57+5:30
सॅनोटाइजच्या सहसंस्थापक म्हणतात आम्ही भागीदाराच्या शोधात
लंडन : भारत कोरोना विषाणू हल्ल्याच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असताना नेसल स्प्रे या विषाणूपासून संरक्षण देणारा ठरू शकतो. हा स्प्रे तातडीच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे, असे हा स्प्रे विकसित करण्यात मदत केलेल्या इस्रायलच्या वैज्ञानिकाने म्हटले. हा नायट्रिक ऑक्साइड स्प्रे व्हँकोव्हेर बायाटेक कंपनी सॅनोटाइजने विकसित केला आहे व त्याच्या इंग्लड व कॅनडातील चाचण्यांचे निष्कर्ष हे आश्वासक आहेत.
या स्प्रेला तातडीची मान्यता मिळावी यासाठी कंपनी जागतिक नियामकांकडे सादर करण्याची तयारी करीत आहे. ‘सॅनोटाइज’द्वारे कोरोनावर प्रभावीपणे उपचार करण्यात एका क्लिनिकल चाचणीत यश आले आहे. ‘सॅनोटाइज’ हा नेसल स्प्रे आहे. ‘सॅनोटाइज’चा वापर केल्यास कोरोनाबाधितांतील विषाणूचा प्रभाव २४ तासांत ९५ टक्के आणि ७२ तासांत ९९ टक्के कमी झाल्याचे दिसले आहे.
बायोटेक कंपनी ‘सॅनोटाइज रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ आणि ब्रिटनच्या ‘ॲशफोर्ड अँड पीटर्स हॉस्पिटल्स’ने ही क्लिनिकल चाचणी केली. या चाचणीचे निष्कर्ष १६ एप्रिल रोजी जाहीर केले गेले. सॅनोटाइज नेसल स्प्रे सुरक्षित आणि प्रभावी विषाणूविरोधी उपचार असल्याचे संकेत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखता येणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ही चाचणी होत असताना ७९ कोरोनाबाधितांवर सॅनोटाइज नेसल स्प्रेचा किती परिणाम होतो हे अभ्यासण्यात आले. स्प्रेचा वापर केल्यामुळे या रुग्णांतील सार्स-कोव्ह-२ विषाणूचा प्रभाव घटला.
रिगेव्ह म्हणाल्या की, नियामकांकडून मान्यता मिळवणे आणि व्यावसायिक पातळीवरील उत्पादनासाठी निधी मिळण्यास वेळ लागेल. औषध कंपन्यांना आणि नियामकांना तयार करणे हे परिणामकारक आहे. आधी तुमच्याकडे माहिती हवी. हा स्प्रे तुम्ही स्वत: सोबत बाळगू शकता. जसा काही हँड सॅनिटायझर आहे.
भारतात आम्ही सध्या योग्य भागीदार शोधत आहोत आणि कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी त्याला भारतात वैद्यकीय उपकरण म्हणून मान्यता मिळेल अशी आशा आहे. आम्ही हा स्प्रे गेल्या वर्षी भारतीय बाजारात आणू शकलो असतो तर दशलक्षावधी जीव वाचवता आले असते.
-डॉ. गिली रिगेव्ह,
सॅनोटाइजच्या सहसंस्थापक आणि सीईओ