Corona Vaccine: ६५ कोटींपैकी ५७ कोटी डोस कोविशिल्डचे; स्पुटनिकला नाही मागणी, कोव्हॅक्सिनची मात्र टंचाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 07:18 AM2021-09-02T07:18:50+5:302021-09-02T07:18:57+5:30
स्पुटनिकला नाही मागणी, कोव्हॅक्सिनची मात्र टंचाई
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भारताने देशव्यापी लसीकरणात ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कोविड-१९ लसींच्या ६५.४० कोटी मात्रा दिल्या असून, हा विक्रम आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत झाला आहे. परंतु, या लसीकरण कार्यक्रमाचा संपूर्ण भार हा कोविशिल्डवर पडला आहे. कारण ६५.४० कोटी मात्रांपैकी ५७ कोटींपेक्षा जास्त मात्रा या लसीच्या दिल्या गेल्या आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीच्या पाच कोटी मात्रांचा पुरवठा मे-जूनपर्यंत करू असे मोठे दावे केले तरी ते पोकळ ठरले. काेव्हॅक्सिनच्या फक्त ७.८५ कोटी मात्रा दिल्या गेल्या आहेत. धक्कादायक म्हणजे रशियन लस स्पुटनिक व्ही लोकांना आकर्षित करून घेऊ शकली नाही.
दोन महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करून ती उपलब्ध केली गेली होती. आतापर्यंत तिच्या ७.४९ लाख मात्रांचा वापर झाला असून, त्यातील बहुतांश या तेलंगण आणि आंध्र प्रदेशमध्ये तसेच आणखी दोन राज्यांत दिल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात स्पुटनिक व्हीच्या एक लाखापेक्षा कमी मात्रांचा वापर झाला आहे. स्पुटनिकचा वापर हा खासगी रुग्णालये आणि संस्थांमध्येच झालेला आहे.
यामुळे यश मिळाले
गेल्या वर्षी महामारीच्या मध्यात सीरम इन्स्टिट्यूटने (सीआयआय) पुढाकार घेऊन ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेकासोबत कोविशिल्ड आणण्यासाठी मोठी गुंतवणूक केली नसती तर आज भारतात लसीकरण मोहिमेचे जे यश आहे, ते मिळाले नसते, असे सरकारी सूत्रांनी मान्य केले.
सीरम इन्स्टिट्यूटने २० कोटी लस मात्रा सरकारला पुरविण्याचे ठरविले असून, ती कोवाकोक्स या नव्या लसीवर काम करीत आहे. एसआयआयने गेल्या आठ महिन्यांत सरकारला ६० कोटी मात्रांचा पुरवठा केला असून, हादेखील विक्रम आहे.