Corona vaccine: १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी फायझर लस प्रभावी असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 06:58 AM2021-05-28T06:58:12+5:302021-05-28T06:59:34+5:30
Corona vaccine News: आम्ही बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी प्रभावी ठरली असून तिच्या आपत्कालीन वापरासाठी तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती फायझर या कंपनीने केंद्र सरकारला केली आहे.
नवी दिल्ली : आम्ही बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी प्रभावी ठरली असून तिच्या आपत्कालीन वापरासाठी तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती फायझर या कंपनीने केंद्र सरकारला केली आहे. भारतात कोरोना विषाणूचा जो नवा प्रकार फैलावला आहे त्यावरही ही लस परिणामकारक असल्याचा दावा फायझरने केला आहे.
यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, फायझर कंपनीची लस दोन ते आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानात शीतगृहामध्ये किमान एक महिना अत्यंत सुरक्षित पद्धतीने ठेवता येते. या लसीला आपत्कालीन वापरासाठी तातडीने मंजुरी मिळाल्यास जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत ५ कोटी डोस देण्याची तयारी फायझर कंपनीने दाखविली आहे. मात्र या लसीमुळे काही प्रतिकूल घटना घडल्या तर त्यावेळी नुकसान भरपाई देण्याच्या खटल्यांपासून या कंपनीला केंद्र सरकारकडून संरक्षण हवे आहे.
मात्र देशात कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुतनिक या तीन लसींचा सध्या वापर सुरू असून त्यांच्या उत्पादक कंपन्यांना अशी कोणतीही सूट भारताने दिलेली नाही. देशात एसएआरएस-सीओव्ही-२ हा कोरोना विषाणूचा प्रकार सध्या थैमान घालत असून त्याच्यावर फायझरची लस प्रभावी असल्याचा फायझरचा दावा आहे.
भरपाई प्रश्नावरही चर्चा
केंद्र सरकार व फायझर कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या आठवड्यात एक बैठक झाली. जागतिक आरोग्य संघटना व विविध देशांत फायझरच्या लसीचा किती प्रभाव दिसला याबद्दल कंपनीकडून केंद्राला सविस्तर माहिती देण्यात आली. केंद्राने फायझरच्या लसीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याच्या तसेच नुकसान भरपाईच्या विषयावर सरकारी अधिकाऱ्यांनी फायझर कंपनीशी चर्चा केली.