Corona Vaccine: Please Try Later! १८ वर्षावरील लोकांनी रजिस्ट्रेशन करण्यापूर्वीच ‘Cowin’ सर्वर डाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 04:42 PM2021-04-28T16:42:53+5:302021-04-28T16:44:24+5:30
Cowin Server Down As Soon As Registration Process Start: यातच अनेक राज्यांकडे कोविड १९ लसीचा साठा नसल्याने १ मे पासून लसीकरण होणार की नाही याबाबतही अनेक संभ्रम आहेत.
मुंबई – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने मोदी सरकारची चिंताही वाढली आहे. अशातच कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला वेग देण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर सरकारचा भर आहे. यातच येत्या १ मे पासून देशात १८ वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती.
१८ वर्षावरील नागरिकांना लस घेण्यासाठी कोविन वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. आजपासून या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन सुरु होणार होतं. संध्याकाळी ४ पासून रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली पण अवघ्या काही मिनिटांतच या वेबसाईटचा सर्वर डाऊन झाल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. यातच अनेक राज्यांकडे कोविड १९ लसीचा साठा नसल्याने १ मे पासून लसीकरण होणार की नाही याबाबतही अनेक संभ्रम आहेत.
१८ वर्षावरील लोकांना महाराष्ट्रात १ मे पासून लसीकरण नाही
१८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र या वयोगटाला १ मे पासून कोरोना लस मिळणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी दिली आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना १ मेपासून कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ठाकरे सरकारनं या वयोगटाला मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र सध्याच्या घडीला राज्याकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा नसल्यानं १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरू करण्यास आरोग्यमंत्री टोपेंनी असमर्थता दर्शवली. देशात सध्या दोनच लसी उपलब्ध असल्यानं पर्याय उपलब्ध नाहीत. त्यातच लसींची निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांकडे असलेला ५० टक्के साठा केंद्र खरेदी करणार आहे. तर उर्वरित ५० टक्के साठा राज्यं सरकार, खासगी कंपन्या, खासगी रुग्णालयांना खरेदी करता येईल. त्यामुळे राज्यं सरकारांवर मर्यादा येत असल्याची माहिती टोपेंनी दिली.
टप्पे आखले जाणार?
१८ ते ४५ वर्षे वयोगटाचं लसीकरण करण्यासाठी लवकरच संपूर्ण नियोजन केलं जाईल. यासाठी १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ असे तीन गट करण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय दुर्धर आजार असलेल्यांना लसीकरणात प्राधान्य द्यायचं का याबद्दलही विचार सुरू आहे. नागरिकांनी कोविन ऍपवर नोंदणी करून आणि अपॉईंटमेंट घेऊनच लस घेण्यासाठी केंद्रावर यावं. लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असं आवाहनही टोपेंनी केलं.