Corona Vaccine : 'आजीला स्वर्गात लस मिळाली का?'; 'त्या' मेसेजमुळे तरुण संतप्त, आरोग्य विभागावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 05:14 PM2022-01-08T17:14:42+5:302022-01-08T17:27:22+5:30
Corona Vaccine : वेगाने लसीकरण सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे. 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्येने आता तीन हजारांचा टप्पा पार केला आहे. वेगाने लसीकरण सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर चार महिन्यांनी लसीचा डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
मध्य प्रदेशच्या बैतूलमधून एक अजब घटना समोर आली आहे. 4 महिन्यांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला आहे, परंतु अलीकडेच तिच्या कुटुंबीयांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसबद्दल मेसेज पाठवण्यात आला आहे. यानंतर आता 'आजीला स्वर्गात लस मिळाली का?' असा प्रश्न कुटुंबीय उपस्थित करत आहेत. आजीला लस देण्यासाठी स्वर्गात कोण गेले? असं विचारत आरोग्य विभाग फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. बैतूल जिल्ह्यातील खंडारा या गावात ही घटना घडली आहे. शकुंतला यांचा ब्रेन हॅमरेजमुळे 1 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता.
20 डिसेंबर रोजी आरोग्य विभागाकडून शकुंतला यांना कोरोनाचा दुसरा डोस मिळाला आहे आणि आता पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे असा मेसेज आला. यावर महिलेचा नातू रितेश राठोड याने गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्या आजीला स्वर्गात लस मिळाली की ती लस घेण्यासाठी पृथ्वीवर आली? असं विचारलं आहे. तसेच जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी तरुणांनी केली आहे. याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये अनेक मृत व्यक्ती किंवा इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांनाही लसीचा दुसरा डोस मिळाल्याचे मेसेज आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 3,071 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण असून या राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (8 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,41,986 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,83,463 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,72,169 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,44,12,740 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.