Corona Vaccine: लसीचा दुसरा डोस दोन महिन्यांनी; परिणामकारकता अधिक; केंद्राची राज्यांना पत्राद्वारे सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:19 AM2021-03-23T03:19:20+5:302021-03-23T05:49:40+5:30
पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचे न ठेवता ते वाढविण्यात यावे, अशी सूचना करणारे पत्र केंद्र सरकारने सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठविले आहे.
नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसींच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचे आहे. मात्र, यापैकी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस
२८ दिवसांनंतर न देता सहा ते आठ आठवड्यांनी द्यावा, अशी सूचना केंद्र सरकारने सोमवारी सर्व राज्यांना केली.
पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचे न ठेवता ते वाढविण्यात यावे, अशी सूचना करणारे पत्र केंद्र सरकारने सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठविले आहे. मात्र, कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर आहे तसेच ठेवण्याचे केंद्राने सुचविले आहे.
शास्त्रीय पुराव्यांच्या आधारावर कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधील अंतराचा नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतील तज्ज्ञांचे पथक यांनी आढावा घेतला आहे.
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील सध्याचे २८ दिवसांचे अंतर वाढवून ते सहा ते आठ आठवड्यांचे केल्यास लसीची परिणामकारकता आणि सुरक्षा वृद्धिंगत होत असल्याचे या आढाव्यात आढळून आले. मात्र, दोन डोसमधील अंतर सहा ते आठ आठवड्यांपेक्षा अधिक नसावे, असे सरकारने पत्रात म्हटले आहे.
तब्बल साडेचार कोटी लोकांना मिळाली लस
१६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेचा १ मार्चपासून तिसरा टप्पा सुरू झाला असून, त्यात ६० वर्षे वयावरील कोणालाही तसेच सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील लोकांना लसींचे डोस देण्यात येत आहेत. आतापर्यंत साडेचार कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, असे असूनही कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या वाढू लागली आहे.