Corona vaccine: भारतीयांना दिले त्यापेक्षा अधिक डाेस परदेशात पाठविले; सरकारची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 07:10 AM2021-03-28T07:10:15+5:302021-03-28T07:10:41+5:30
संयुक्त राष्ट्र : ७० हून अधिक देशांना पुरविली लस
संयुक्त राष्ट्र/नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना काेराेना लसींचे जेवढे डाेस दिले त्यापेक्षा अधिक डाेस इतर देशांना पुरविल्याची माहिती भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिली आहे. लस पुरवठ्यातील असमानता कोराेना महामारीला राेखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पराभूत करेल, असा इशाराही भारताने दिला आहे. या असमानतेमुळे गरीब देशांवर सर्वात विपरीत परिणाम हाेतील, असे भारताने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांत भारताच्या राजदूतांचे उपप्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी भारताच्या भूमिकेबाबत माहिती देताना सांगितले की, लसींच्या आव्हानावर ताेडगा निघाला आहे. आता लसींची उपलब्धता आणि पुरवठ्याचे आव्हान समाेर आहे. जागतिक पातळीवर सहकार्याचा अभाव आणि असमानतेचा गरीब देशांना सर्वाधिक फटका बसणार आहे. अशा स्थितीतही भारत सहा महिन्यांमध्ये ३० काेटी आघाडीच्या काेराेना याेद्ध्यांचे लसीकरण करणार आहे. तसेच या प्रक्रियेदरम्यान ७० हून अधिक देशांना काेराेनाची लस पुरविली आहे. देशातील लसीकरणापेक्षा जास्त डाेस इतर देशांना पुरविल्याचे नायडू यांनी सांगितले.
लस डिप्लाेमसीवरून टीका
सरकारने लसींच्या निर्यातीपेक्षा भारतीय नागरिकांना प्राधान्य देऊन लसीकरण केले असते तर काेराेनाची दुसरी लाट राेखता आली असती, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या डाॅ. शामा माेहम्मद यांनी केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या मुद्द्यावरून टीका केली आहे. या मुत्सद्दीपणाची भारताला किंमत माेजावी लागली असून, देशात कराेनाची दुसरी लाट राेखण्यासाठी या डाेसची मदत झाली हाेती, असे अब्दुल्ला म्हणाले.
‘काेवॅक्स’ केंद्राला दाेन काेटी डाेस
भारताकडून ‘गावी’ देशांच्या ‘काेवॅक्स’ केंद्राला लसीचे दाेन काेटी डाेस पुरविण्यात आले आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता माेहिमांसाठी २ लाख काेराेना लसींचे डाेस पाठविण्यात आले आहेत. भारताच्या या पुढाकाराचे संयुक्त राष्ट्रांकडून आभार मानण्यात आले आहेत.