Corona vaccine: सीरमची कोवोवॅक्स जूनमध्ये येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 04:32 AM2021-01-31T04:32:02+5:302021-01-31T04:32:31+5:30
Corona vaccine Update: अमेरिकी औषध कंपनी नोवावॅक्सच्या सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट कोवोवॅक्स ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे. ही लस यंदाच्या जून महिन्यापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : अमेरिकी औषध कंपनी नोवावॅक्सच्या सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट कोवोवॅक्स ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे. ही लस यंदाच्या जून महिन्यापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.
ही माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली. ते म्हणाले की, कोवोवॅक्स ही लस ८९.३ टक्के परिणामकारक असल्याचे ब्रिटनमधील पाहणीत आढळून आले आहे. कोवोवॅक्स लसीच्या भारतामध्ये मानवी चाचण्या करण्यास परवानगी मिळावी याकरिता सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारकडे काही महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे.
भारताने जानेवारी महिन्यात जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये सध्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली कोविशिल्ड तसेच भारत बायोटेक या कंपनीची कोव्हॅक्सिन या दोन लसी देण्यात येतात. या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्यानंतर लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. कोवोवॅक्स ही लस जून महिन्यापासून उपलब्ध झाल्यास भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लसींमध्ये आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध होईल.
देशात उपचाराधिनांचे प्रमाण अवघे १.५८ टक्के, बरे झाले १ कोटी ४ लाख
देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आणखी कमी झाली आहे. सध्या १ लाख ६९ हजार रुग्ण असून, त्यांचे प्रमाण अवघे १.५८ टक्के आहे. कोरोनाच्या संसर्गातून १ कोटी ४ लाख लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७ टक्क्यांच्या घरात पोहोचले आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात १,०७,३३,१३१ रुग्ण असून, त्यातील १,०४,०९,१६० जण बरे झाले आहेत.
शनिवारी कोरोनामुळे १३७ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींचा आकडा १,५४,१४७ वर पोहोचला आहे. या दिवशी कोरोनाचे १३,०८३ नवे रुग्ण आढळून आले, तर १४,८०८ जण बरे झाले. देशात १,६९,८२४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा मृत्युदर अवघा १.४४ टक्के आहे. जगभरात १० कोटी २६ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ७ कोटी ४३ लाख रुग्ण बरे झाले तर २२ लाख १६ हजार जणांचा बळी गेला आहे.