Corona Vaccine: कोरोनावरील लस घेतल्यानंतर २६ हजार जणांना साइड इफेक्ट, तर एवढ्या लोकांचा मृत्यू, सरकारी आकडेवारीतून माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 04:46 PM2021-06-14T16:46:01+5:302021-06-14T16:48:33+5:30
Corona Vaccine: कोरोनावरील लस घेतल्यानंतरही काही जणांचा मृत्यू झाल्याच्या तसेच लसीचा साईड इफेक्ट झाल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान सरकारी आकडेवारीमधून याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशातील कोरोनाविरोधातील लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. दरम्यान, कोरोनावरील लस घेतल्यानंतरही काही जणांचा मृत्यू झाल्याच्या तसेच लसीचा साईड इफेक्ट झाल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान सरकारी आकडेवारीमधून याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार कोरोनावरील लस घेतल्यानंतर सुमारे ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ हजार जणांना कोरोनाची लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट दिसून आले आहेत.
न्यूज १८ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रसारीत केले आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर सुमारे २६ हजार लोकांवर साईड इफेक्ट दिसून आले आहेत. तर ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारची आकडेवारी प्रत्येक देशात जमा केले जात आहेत. त्याचा अभ्यास करून भविष्यात लसीचे साइड इफेक्ट कमी करण्यावर प्रयत्न केला जाईल. दरम्यान, आकडेवारी पाहिल्यास लसीकरणाच्या तुलनेत मृतांची संख्या कमी आहे.
आतापर्यंत देशात ७ जूनपर्यंत २३.५ कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. यादरम्यान २६ हजार २०० एईएफआय प्रकरणे समोर आली आहेत. याचे टक्केवारीमध्ये आकलन केल्यास हा आकडा केवळ ०.०१ टक्के एवढाच आहे. कोरोनाची लस घेतलेल्या १० हजार व्यक्तींपैकी केवळ एका व्यक्तीवर साईड इफेक्ट दिसून आले आहेत. तर दर दहा लाखांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या दोन्ही लसींमध्ये ०.१ टक्के एईएफआय केस मिळाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते मृत्यूची संख्या आणि एइएफआयचे रुग्ण दोन्ही कमी आहेत. त्यामुळे तज्ज्ञ कोरोनावरील लस घेण्याचे आवाहन सर्वांना करत आहेत. भारतामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत सध्या कोरोनाला रोखण्यासाठी लस हेच प्रभावी हत्यार आहे.