corona vaccine : अदर पूनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भावूक आवाहन, म्हणाले, “कोरोनाला रोखायचे असेल तर…’’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 04:43 PM2021-04-16T16:43:18+5:302021-04-16T16:46:41+5:30
corona vaccination News : अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर (Serum Institute of India) मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पुणे - गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूने () पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भारतात तर कोरोनाचा दुसऱ्या लाटेने भयावह रूप धारण केले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोनाच्या लसीची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (corona vaccination) मात्र अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर (Serum Institute of India) मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसेच लसीचे उत्पादन ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden ) यांना भावूक आवाहन केले आहे. ( SII CEO Adar Poonawala's emotional appeal to US President Joe Biden )
पूनावाला यांनी ट्विट करून अमेरिकेमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या मलावर लादलेले निर्बंध हटवण्याची विनंती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना केली आहे. या ट्विटमध्ये अदर पूनावाला म्हणतात की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महोदय, जर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी खऱ्या अर्थाने एकजूट व्हायचं असेल तर अमेरिकेच्या बाहेरील लस उद्योगाकडून मी तुम्हाला विनंती करतो की, अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावर घालण्यात आलेले निर्बंध हटवा. जेणेकरून कोरोनाविरोधातील लसींचे उत्पादन वाढवता येईल. तुमच्या प्रशासनाकडे याबाबतची पूर्ण माहिती आहे.
Respected @POTUS, if we are to truly unite in beating this virus, on behalf of the vaccine industry outside the U.S., I humbly request you to lift the embargo of raw material exports out of the U.S. so that vaccine production can ramp up. Your administration has the details. 🙏🙏
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 16, 2021
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेकाद्वारे विकसित करण्यात आलेल्या कोरोनावरील कोविशिल्ड या लसीचे उत्पादन करत आहे. भारतामध्ये या लसीच्या वापराला पहिल्यांदा मान्यता मिळाली होती. तसेच या लसीची अनेक देशांना निर्यातही होत आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया जगातील सर्वाधिक लसींची निर्मिती करते. हल्लीच भारतातील काही राज्यांमध्ये लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त आले होते. मात्र केंद्र सरकारने कोरोनाविरोधातील लसींचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, अदर पूनावाला यांनी आधीही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी पुरेसा कच्चा माल उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. अमेरिकेने डिफेन्स अॅक्ट अंतर्गत कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी आणल्याने लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना लसीच्या कच्च्या मालावर बंदी घालणे म्हणजे लसीवर निर्बंध लादण्यासारखे असल्याचे म्हटले होते. सिरम इन्स्टिट्युटमध्ये नोवाव्हॅक्स या कोरोनावरील लसीचेही उत्पादन होत आहे. मात्र कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे हे उत्पादन बंद पडले आहे.
सीरम इन्स्टिट्युट अमेरिकेकडून विविध प्रकारच्या कच्च्या मालाची आयात करते. त्याची याजी मोठी आहे. आयत्यावेळी पुरवठादार शोधण्यास उशीर लागणार आहे. कंपनी नवा पुरवठादार शोधत आहे. सहा महिन्यांनंतर अमेरिकेवर अवलंबून राहावे लागणार नाही. मात्र कंपनीला सध्या कच्च्या मालाची गरज आहे, असे पूनावाला यांनी सांगितले.