Corona Vaccine : ‘स्पुटनिक-व्ही’ लसीला मिळाला हिरवा कंदील, पुढील महिन्यात लस बाजारात दाखल होऊ शकते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:58+5:302021-04-13T06:58:39+5:30
Sputnik-V vaccine : सुरुवातीला ‘स्पुटनिक-व्ही’ लस रशियाकडून आयात केली जाईल. लसीची परिणामकारकता ९१.६ टक्के असून मॉडर्ना आणि फायझर यांच्या लसींनंतर जगात सर्वाधिक दिली जाणारी लस म्हणून ‘स्पुटनिक-व्ही’चा लौकिक आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : देशातील लसीकरणाला वेग देण्यासाठी ‘स्पुटनिक-व्ही’ या रशियन बनावटीच्या लसीला हिरवा कंदील देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. ‘स्पुटनिक-व्ही’च्या आपत्कालीन परिस्थितीतील वापराला मंजुरी देण्याची शिफारस विषय तज्ज्ञांच्या समितीने (एसईसी) भारताच्या औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) केली असून पुढील महिन्यात ही लस बाजारात दाखल होऊ शकते. किंमत आणि साठवण या दोनच अडचणी तूर्तास आहेत.
सुरुवातीला ‘स्पुटनिक-व्ही’ लस रशियाकडून आयात केली जाईल. लसीची परिणामकारकता ९१.६ टक्के असून मॉडर्ना आणि फायझर यांच्या लसींनंतर जगात सर्वाधिक दिली जाणारी लस म्हणून ‘स्पुटनिक-व्ही’चा लौकिक आहे. रशियन यंत्रणांनी लसीचे परिणाम १ एप्रिल रोजी केंद्राला सादर केले होते. त्याबाबत केंद्र समाधानी असल्याचे समजते.
किंमत किती?
- ‘‘स्पुटनिक-व्ही’ लसीच्या किमतीवरून सध्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्याशी चर्चा सुरू आहे.
- कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची किंमत १५० ते २१० रुपयांच्या श्रेणीत असल्याने ‘स्पुटनिक-व्ही’ लसही त्याच किमतीत प्राप्त व्हावी, यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे.
- इतर देशांमध्ये ‘स्पुटनिक-व्ही’ची किंमत ७५० रुपये आहे.