Corona vaccine: जवळच्या केंद्रात लस आहे की नाही? आता व्हॉट्सऍपवर समजणार, सरकारने जारी केला नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 03:42 PM2021-05-20T15:42:03+5:302021-05-20T15:42:12+5:30
Corona vaccination in India: सर्वसामान्यांपर्यंत सुलभतेने लस पोहोचावी यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
नवी दिल्ली - कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्यांपर्यंत सुलभतेने लस पोहोचावी यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (Coronavirus) त्यात आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आरोग्य मंत्रालयाने एक मोबाईल नंबर प्रसिद्ध केला आहे. या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही तुमच्या परिसरात असलेल्या लसीकरण केंद्रात लस उपलब्ध आहे की नाही? याची माहिती मिळवू शकता. (Corona vaccination in India)
आरोग्य मंत्रालयाने ९०१३१५१५१५ हा क्रमांक प्रसिद्ध केला आहे. जवळपासच्या लसीकरण केंद्रात लस उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला या क्रमांकावर केवळ एक मेसेज करवा लागेल, व्हॉट्सऍपवर या क्रमांकावर जाऊन तुम्हाला तुमच्या भागाचा पिन कोड टाइप करून सेंड करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या भागात असलेल्या लसीच्या उपलब्धतेबाबत अधिकृत माहिती मिळेल.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यामुळे लस घेण्यासाठी फार त्रास घ्यावा लागणार नाही. तसेच अनावश्यकपणे वारंवार कुठल्याही सेंटरवरही जावे लागणार नाही. जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्ही एकवेळ लसीबाबत अवश्य अपडेट घ्या. त्यानंतर लसीकरण केंद्रात जाऊन कोरोनावरील लस घ्या.
दरम्यान कोरोना चाचणीबाबतही आयसीएमआरने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत आयसीएमआरने दिलेल्या सल्ल्यानुसार आता कोरोनाची चाचणी घरामधूनही करता येणार आहे. यासाठी रँपिड अँटिजन टेस्टसाठीच्या एका किटला आयसीएमआरकडून परवानगी मिळाली आहे. या किटच्या माध्यमातून लोक घरामध्येच नाकाच्या माध्यमातून कोरोना चाचणीसाठी सँपल घेऊ शकतील.