Corona Virus: सतर्क होण्याची वेळ, कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, देशात १०९ दिवसांनंतर प्रचंड रुग्णवाढ, सापडले ७९६ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 12:37 PM2023-03-17T12:37:43+5:302023-03-17T12:38:58+5:30
Corona Virus: जवळपास दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली काढल्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये देशात कोरोनामुक्त वातावरण निर्माण झाले होते. मात्र भारतात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे.
जवळपास दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली काढल्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये देशात कोरोनामुक्त वातावरण निर्माण झाले होते. मात्र भारतात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. काल देशात एका दिवसात कोरोनाचे ७९६ नवे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ४६ लाख ९३ हजार ५०६ एवढी झाली आहे. तर भारतामध्ये सध्या कोरोनाचे ५ हजार २६ सक्रिय रुग्ण आहेत. जहळपास १०९ दिवसांनंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजारांच्या पुढे पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटक, पुदुच्चेरी आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ५ लाख ३० हजार ७९५ एवढी झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार भारतामध्ये आजच्या घडीला कोरोनाचे ५ हजार २६ रुग्ण सक्रिय आहेत. एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण ०.०१ टक्के एवढं आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.८० टक्के आहे. आतापर्यंत ४ कोटी, ४१ लाख, ५७ हजार ६८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे झालेला मृत्यूदर हा १.१९ टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार देशामध्ये लसीकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत २२०.६४ कोटी लसी देण्यात आल्या आहेत.
देशात १६ सप्टेंबर २०२० रोजी कोरोना रुग्णसंख्या ५० लाखांवर पोहोचली होती. तर १९ डिसेंबर २०२० रोजी कोरोनाच्या रुग्णसंख्येने १ कोटींचा टप्पा ओलांडला होता. ४ मे २०२१ रोजी कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी तर २३ जून रोजी कोरोना रुग्ण संख्या ३ कोटी आणि २५ जानेवारी २०२२ रोजी कोरोना रुग्णसंख्येने ४ कोटींचा टप्पा ओलांडला होता.