Corona Vaccine : येत्या आठवड्यापासून देशभरात लसीकरणाला सुरूवात होण्याची शक्यता, सर्व तयारी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 11:25 AM2021-01-05T11:25:59+5:302021-01-05T11:26:23+5:30
Corona Vaccine: पुढील ६-८ महिन्यांत जवळपास ३० कोटी लोकांना लसीचे डोस दिले जाण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : पुढील आठवड्यापासून देशभरात कोरोना लसीकरणाचे काम सुरू होऊ शकते. गेल्या रविवारी सरकारने आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेकाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसींना मान्यता दिली आहे. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, लसीकरणाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात केले जाईल. पुढील ६-८ महिन्यांत जवळपास ३० कोटी लोकांना लसीचे डोस दिले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत देशात तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीचे डोस नागरिकांना देण्यात सुरुवात होणार आहे, असे म्हटले होते.
हिंदुस्तान टाईम्सने सरकारी सुत्रांचा हवाला देत दावा केला आहे की, कोरोनावरील लसींना ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्यांची साठवणूक करण्याचे काम सुरू झाले आहे. एका सरकारी अधिकाऱ्यांने सांगितले की, ज्या दोन लसींच्या कंपन्यांना ग्रीन सिग्नल मिळाला आहे, त्यांच्याबरोबर सरकार आता खरेदीचा करार करत आहे. 5 ते 6 कोटी लसींचे डोस वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये खरेदी केले जातील. सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 3 कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे.
सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कागदाच्या कामात थोडा वेळ लागेल, मात्र लसीकरण करण्यास उशीर होऊ नये म्हणून इतर गोष्टी वेगाने केल्या जात आहेत. संपूर्ण देशभरात लसीकरणाची ड्राय रन यशस्वी झाली आहे. काही राज्यांमध्ये समस्या उद्भवली. पण आता सर्व समस्या दूर करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त कोविन अॅपद्वारे लसीकरण देण्यासाठी नोंदणीचे काम केले जाईल, हेही निश्चित केले आहे.
लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी करार पूर्ण झाल्यानंतर देशातील विविध 31 मुख्य केंद्रांमध्ये लस ठेवली जाईल. ही केंद्रे देशाच्या विविध भागात तयार करण्यात आली आहेत. यानंतर या लसी येथून देशातील 28 हजार लसीकरणाच्या ठिकाणी पाठविल्या जातील. ही लसीकरणाची ठिकाणी विविध राज्यांमध्ये आहेत. गरज भासल्यास लसीकरण ठिकाणांची संख्या वाढवता येऊ शकते, असे म्हटले जात आहे. सर्वात आधी लसीचा डोस एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. यानंतर जवळपास 2 कोटी फ्रंटलाइन वर्कर्संना देण्यात येणार आहे.
हेल्पलाइन नंबर
देशभरात हेल्पलाइन नंबरही तयार करण्यात येत आहे, जेणेकरुन लस संबंधित सर्व माहिती लोकांना दिली जाऊ शकेल. आतापर्यंत देशभरातील दीड लाख लोकांना लस देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक प्रक्रियेनुसार प्रत्येक बूथ स्तरावर लसीकरणाचे काम केले जाईल.यूआयपी अंतर्गत 28900 कोल्ड साखळी आणि जवळपास 8500 इक्विपमेंट वापरली जातील.