Corona vaccine: ॲपवर नाव नोंदवणाऱ्यांनाच लस; १८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:50 AM2021-04-26T00:50:34+5:302021-04-26T06:36:57+5:30
१८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण मोहीम
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना येत्या १ मेपासून कोरोना लस देण्यात येणार आहे मात्र लस घेण्यासाठी त्यांना खासगी केंद्रांवर जावे लागणार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. यासाठी लोकांना को-विन ॲपवर नावाची आगाऊ नोंदणी करावी लागेल, लस घेण्याची वेळ व दिवस निश्चित केला जाईल. ही प्रक्रिया पार न पाडता थेट येणाऱ्यांना लस दिली जाणार नाही. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
६८% जणांनी नाव नोंदवले नसल्याचे उघड
देशात १४ कोटीहून अधिक नागरिकांना लस दिली आहे. ॲपवर नावनोंदणी न करता थेट केंद्रावर लस घेतलेल्याने एकूण संख्या वाढण्यास मदत झाली. शनिवारपर्यंत ६८ टक्के लोकांनी ॲपवर नाव न नोंदविता थेट केंद्रावर जाणे पसंत केले. तर ११.६ टक्के लोकांनी ॲपवर नावनोंदणी केली होती. त्याशिवाय डॉक्टर, आरोग्यसेवक व कोरोना योद्ध्यानाही लस घेण्यासाठी को-विन ॲपवर आपली नावे नोंदविली होती.