Corona Vaccine: केंद्राला १५० रुपयांना लस, मग राज्यांना का नाही?; अरविंद केजरीवाल यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 05:59 AM2021-04-27T05:59:41+5:302021-04-27T06:42:03+5:30
दिल्लीत १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस
विकास झाडे
नवी दिल्ली : आम्ही १८ वर्षांवरील सगळ्यांनाच दिल्लीत मोफत लस देणार आहोत. परंतु लस निर्माते केंद्र सरकारला १५० रुपयांत आणि राज्य सरकारांना ४०० व ६०० रुपयांमध्ये लस उपलब्ध करून देणार असल्याचे कोडे उलगडले नाही. केंद्र असो की राज्य दोघांनाही एकाच किमतीने लस मिळायला पाहिजे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
केजरीवाल यांनी दिल्लीत १८ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस देणार असल्याचे जाहीर केले. यासंदर्भात दिल्ली सरकार नियोजन करीत असून लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी १ कोटी ३४ लाख लस खरेदीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासोबतच १८ वर्षांखालील मुलांनाही लसीकरण व्हावे, त्यांना हीच लस चालणार आहे का? किंवा कसे याबाबत केंद्राने नियोजन करावे. लहान मुलेही कोरोना विषाणुमळे दगावलीत.
दरात भेदभाव
केंद्र सरकारला लस १५० रुपयांत आणि राज्यांना ४०० व ६०० रुपयांमध्ये दराने असे का? यावर केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने यात लक्ष द्यावे. देश कोणत्या अवस्थेतून जातोय आणि यांना पैसा कमवायला लस मिळाली काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
हजार खाटांचे सेंटर
राधा स्वामी सत्संग व्यास इथे आज ५०० ऑक्सिजन खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. इथे २०० आयसीयू खाटा तयार करण्यात आल्या असून या सेंटरमध्ये टप्प्याटप्याने ५००० खाटा करण्यात येतील. दिल्लीत १५ दिवसांच्या काळात ४ लाख ६३ हजार ८९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. परंतु याच काळात २ लाख ४४ हजार रुग्ण हे कोरोनामुक्त झाले.