3 कोटी लोकांना भारतात पहिल्या टप्प्यात देणार कोरोनाची लस, डॉक्टर, आरोग्यसेवकांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 03:31 AM2020-10-23T03:31:56+5:302020-10-23T07:00:51+5:30
केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना लसीची साठवणूक करण्यासाठी तसेच डिजिटल हेल्थ आयडी देण्याकरिता इव्हिन या अनोख्या यंत्रणेचा उपयोग केंद्र करणार आहे. लसीसंदर्भात नेमलेली तज्ज्ञांची समिती या लसीचे वितरण कसे केले जावे याविषयी धोरण आखत आहे.
नवी दिल्ली : कोरोना लस विकसित झाल्यानंतर देशात सर्वप्रथम ती तीन कोटी लोकांना देण्यात येणार असून, त्यामध्ये डॉक्टर, आरोग्यसेवकांचा समावेश असेल. ही लस टप्प्याटप्प्याने इतर लोकांनाही देण्यात येईल. त्यासाठीचे धोरण केंद्र सरकारने नेमलेली तज्ज्ञ समिती तयार करत आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांना कोरोना लस देण्यात येईल, त्यामध्ये सुमारे १ कोटी डॉक्टर व दोन कोटींपेक्षा अधिक आरोग्यसेवकांचा समावेश असेल.
केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना लसीची साठवणूक करण्यासाठी तसेच डिजिटल हेल्थ आयडी देण्याकरिता इव्हिन या अनोख्या यंत्रणेचा उपयोग केंद्र करणार आहे. लसीसंदर्भात नेमलेली तज्ज्ञांची समिती या लसीचे वितरण कसे केले जावे याविषयी धोरण आखत आहे. त्यामध्ये एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, परराष्ट्र व्यवहार यासह विविध खात्यांचे प्रतिनिधी, आयसीएमआर आदी संस्थांमधील तज्ज्ञांचा समावेश आहे.
व्याधिग्रस्तांना प्राधान्य
५० वर्षे वयावरील तसेच त्यापेक्षा कमी, पण एकाहून अधिक व्याधींनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनाही पहिल्या टप्प्यातच कोरोनाची लस दिली जाईल. ज्या आरोग्यसेवकांना कोरोना लस द्यायची आहे, त्यांच्या नावाच्या यादीचे काम चालू महिन्यात वा नोव्हेंबरच्या सुरुवातीला पूर्ण होईल.