Corona Vaccine: मस्तच!... लस ठरतेय प्रभावी; लसीकरण झालेल्या १० हजारांत फक्त २ ते ४ जणांना कोरोना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 08:18 PM2021-04-21T20:18:31+5:302021-04-21T20:22:06+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे लसीकरण मोहीम.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून यात ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांचं लसीकरण केलं जात आहे. तर दुसरीकडे आता १ मे पासून देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार असून यात १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण केलं जाणार आहे. भारतात विक्रमी वेळेत १० कोटी पेक्षा अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. परंतु आताही अनेकांच्या मनात लसीबाबत काही संका आहेत. बुधवारी सरकारनं याबाबत माहिती देत या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. सरकारनं बुधवारी काही आकडेवारी जारी केली. यानुसार लसीकरण झालेल्यांपैकी ०.०२ टक्के ते ०.०४ टक्के लोकांनाच लसीकरणानंतर कोरोनाची बाधा झाली आहे. म्हणजेच १० हजार लस घेणाऱ्या लोकांपैकी केवळ दोन ते चार लोकांनाचा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सरकारनं नमूद केलं. लसीकरणानंतरही जर कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन असं संबोधलं जातं.
आकडेवारीनुसार देशात जवळपास १३ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं. यापैकी पहिला डोस घेणाऱ्या १०,०३,०२,७४५ लोकांपैकी केवळ १७,१४५ लोकांनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगण्यात आलं. हे एकूण संख्येच्या ०.०२ टक्के इतकं आहे. तर कोविशिल्डचा दुसरा डोस घेणाऱ्या १,५७,३२,७५४ लोकांपैकी ५,०१४ लोकांना ब्रेक थ्रू इनफेक्शन झालं. जे एकूण आकडेवारीच्या ०.०३ टक्के इतकं आहे.
१.१ कोटी लोकांना कोवॅक्सिन
याच प्रमाणे आतापर्यंत १.१ कोटी लोकांना कोवॅक्सिनचा डोस देण्यात आला. यात पहिला डोस घेणाऱ्या ९३,५६,४३६ लोकांपैकी ४,२०८ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. जे एकूण संख्येच्या ०.०४ टक्के इतकं आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्या १७,३७,१७८ लोकांपैकी केवळ ६९५ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. जे एकूण संख्येच्या ०.०४ टक्के आहे.
एकूण संख्येचा विचार केला तर भारतात १०,९६.५९.१८१ लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यानपैकी आतापर्यंत २१,३५३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ही संख्या एकूण संख्येच्या ०.०२ टक्के आहे. म्हणजेच १० हजार जणांपैकी २ जणांना कोरोनाची लागण झाली. तर देशात १,७४६९,९३२ लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. यापैकी ५,७०९ लोकांना कोरोनाची बाधा झाली. याचाच अर्थ १० हजार जणांमधून तीन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला.
गंभीर संसर्गापासून रक्षण
"लस तुम्हाला गंभीर आजार होण्यापासून वाचवते. परंतु ती संक्रमण होण्यापासून वाचवणार नाही असंही होण्याची शक्यता आहे. लसीकरणानंतरही पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊ शकतात. यासाठी लसीकरणानंतरही मास्क परिधान करणं आवश्यक आहे. आपण काय तयारी केली आणि कुठे चूक झाली हे पाहण्याची ही वेळ नाही. एकत्र येईल या महासाथीचा सामना करण्याची ही वेळ आहे," असं मत एम्सचे अध्यक्ष रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं.