Corona Virus: देशात कोरोनाचे आणखी १४ रुग्ण; विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ६१

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:54 AM2020-03-11T04:54:45+5:302020-03-11T04:54:56+5:30

केरळमध्ये ८, कर्नाटक, महाराष्ट्रात प्रत्येकी तीन रुग्ण आढळले

Corona Virus: 14 more corona patients in the country; Number of people infected with the virus 61 | Corona Virus: देशात कोरोनाचे आणखी १४ रुग्ण; विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ६१

Corona Virus: देशात कोरोनाचे आणखी १४ रुग्ण; विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ६१

Next

नवी दिल्ली : भारतात मंगळवारी आणखीन १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये केरळमधील आठ, कर्नाटकातील तीन आणि पुण्यातील तिघांचा समावेश आहे. त्यामुळे कोविड-१९ या विषाणूंची लागण झालेल्यांची संख्या ६१ झाली आहे. यामुळे देशभरात भीतीचे वातावरण आहे. यातील दोन रुग्णांवर भारतात प्रथमच एचआयव्ही प्रतिबंधक दोन औषधे देण्यात आली आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून ५० झाली आहे. उर्वरितांच्याबाबत अद्याप दुजोरा मिळालेला नाही. त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येत आहे. राज्य सरकारने त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केल्यानंतर हा आकडा ५९ वर जाईल.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरोप्पा यांनी सांगितले की, कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या चार झाली आहे. यात तीन नव्या रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात काल दोघांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मंगळवारी आणखी तीनजणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूचा तडाखा बसलेल्या इराणमधून ५८ भारतीयांना सकाळी भारतीय हवाई दलाच्या विमानाने मायदेशात परत आणण्यात आले. यामध्ये दोन मुले, २५ पुरुष आणि ३१ महिलांचा समावेश आहे, असे भारतीय हवाई दलाचे प्रवक्ते ग्रुप कॅप्टन अनुपम बॅनर्जी यांनी सांगितले. याबरोबरच ५२९ भारतीयांचे स्वॅबचे नमुनेही आणण्यात आले आहेत. त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे का? याची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येईल. परतलेल्या सर्वांना हिंदान हवाई तळावरील वैद्यकीय सुविधा कक्षात ठेवण्यात आले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, किमान १११६ जणांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. १४९ जण रुग्णालयांतील स्वतंत्र कक्षात आहेत, तर ९६७ जण त्यांच्या घरामध्येच निरीक्षणाखाली आहेत.

एचआयव्ही प्रतिबंधक औषधांचा वापर
दरम्यान, जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-१९ ग्रस्त इटालियन दाम्पत्यावर लोपिनवीर आणि रिटोनवीर या दुसऱ्या स्थरावरील एचआयव्ही प्रतिबंधक औषधाचा वापर करण्यात आला आहे. भारताच्या औषध महानियंत्रकाने कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर मर्यादीत प्रमाणात या औषधांनी उपचार करण्याची परवानगी दिली आहे. तत्पूर्वी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने अशी मंजुरी तातडीने मिळावी, अशी मागणी केली होती. हे औषध देण्यासाठी या दाम्पत्यांचीही पूर्व परवानगी देण्यात आली आहे.

कर्नाटकात नवे ४ रुग्ण
कर्नाटकात १ मार्च रोजी अमेरिकेहून परतलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला या विषाणूची लागण झाली आहे. त्याची पत्नी आणि मुलगीही पॉझिटिव्ह आढळली आहे. ८ मार्चला अमेरिकेतून लंडनमार्गे परतलेल्या आणखी एकालाही या विषाणूची लागण झाली आहे, ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी दिली.

डॉक्टरांसाठी आरोग्यविमा
कोविड-१९ ची लागण झालेल्या तसेच संशयित रुग्णांची तपासणी आणि उपचार करणाºया डॉक्टर्स, रुग्णालयातील आणि प्रयोगशाळांतील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविम्याची व्याप्ती वाढविण्याचा विचार कर्नाटक सरकार करीत असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डी. के. सुधाकर यांनी मगळवारी सांगितले.

म्यानमारची सीमा बंद
इम्फाळ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मणिपूरने मंगळवारी म्यानमारची सीमा बेमुदत काळासाठी बंद केली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. शेजारच्या मिझोरामनेही सोमवारी म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच परदेशी नागरिकांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ट्रम्प यांची तपासणी झाल्याची माहिती नाही : उपराष्ट्रपती
कोरोना विषाणूंची कथित लागण झाल्याच्या संशयावरून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची डॉक्टरांनी तपासणी केली असल्याचे अद्याप माहिती नसून माझीही अशा प्रकारची कोणतीही तपासणी झाली नसल्याचे अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी पत्रकारांना सांगितले.

इराणमध्ये आणखी ५४ बळी
तेहरान : इराणमधील कोरोनाने मंगळवारी आणखी ५४ जण मृत्यूमुखी पडले. यामुळे कोरोनाने घेतलेल्या देशातील बळींची संख्या २९१ झाली आहे. याशिवाय ८०४२ जणांना याविषाणूची लागण झाली असल्याचे आरोग्यमंत्रालयाचे प्रवक्ते कैनोश जहांपौर यांनी सांगितले. चीननंतर इराणला कोरोनाने सर्वाधिक ग्रासले आहे.

केरळमधील शाळा, चित्रपटगृहे बंद
केरळमधील रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा आणि चित्रपटगृहे महिनाअखेरपर्यंत बंद ठेवण्यासह अनेक निर्बंध लागू केले आहेत.

Web Title: Corona Virus: 14 more corona patients in the country; Number of people infected with the virus 61

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.