Corona virus : कोरोनाचा नवीन AY.12 व्हेरिएंट? शास्त्रज्ञांची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 09:11 AM2021-08-30T09:11:50+5:302021-08-30T09:20:54+5:30
Corona virus : जीनोम सीक्वेंसिंगवर लक्ष ठेवणाऱ्या इन्साकॉगने सर्व प्रयोगशाळांसाठी अलर्टही जारी केले आहेत.
नवी दिल्ली : कोरोना व्हायसरचा आता नवीन AY.12 व्हेरिएंट समोर आला आहे. याआधी शास्त्रज्ञ AY.12 ला डेल्टा व्हेरिएंटचा भाग असल्याचे मानत होते. मात्र, AY.12 च्या सक्रियतेमुळे शास्त्रज्ञांना त्याचे स्वतंत्रपणे वर्गीकरण करावे लागले आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.
कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या नमुन्यांच्या जीनोम सीक्वेंसिंगदरम्यान AY.12 म्यूटेशनवर अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे देशभरातील प्रयोगशाळांना सांगण्यात आले आहे. जीनोम सीक्वेंसिंगवर लक्ष ठेवणाऱ्या इन्साकॉगने सर्व प्रयोगशाळांसाठी अलर्टही जारी केले आहेत.
इन्साकॉगच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या नवीन AY.12 व्हेरिएंटबद्दल फारशी माहिती देखील नाही. या म्यूटेशनचा किती परिणाम होत आहे? हे येत्या काही दिवसांत कळेल, पण आतापर्यंत जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये 13 म्यूटेशन झाल्याचे उघड झाले आहे, त्यापैकी हा एक आहे आणि भारतातही AY.12 ची प्रकरणे समोर येत आहेत.
AY.12 अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे
इन्साकॉगच्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, AY.12 म्यूटेशनचा अभ्यास अद्याप सुरू आहे. त्याबद्दल फारशी माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपलब्ध नाही. मात्र, असे आढळले आहे की जगभरातील 33 हजारहून अधिक नमुन्यांची पुष्टी झाली आहे, जी इतर डेल्टाच्या म्यूटेशनच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
याचबरोबर, ते म्हणाले की, AY.12 हा डेल्टाचा एक उप-वंश आहे, जो आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. परंतु त्याच्या संख्येची बारकाईने तपासणी करणे आवश्यक आहे. डेल्टा आणि AY.12 यांच्यातील परिणामांमध्ये काय फरक आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. आता एवढेच म्हणता येईल की हे दोन्हीही एकसारखे दिसत आहेत.
61.2 टक्के कोरोनाचे गंभीर व्हेरिएंट
देशात गेल्या 23 ऑगस्टपर्यंत 78865 नमुन्यांची जीनोम सीक्वेंसिंग झाला आहे. ज्यामध्ये 31,124 म्हणजेच 61.2 टक्के नमुने कोरोना व्हायरसचे गंभीर व्हेरिएंट मिळाले आहेत. डेल्टा व्हेरिएंटचे सर्वाधिक 21192 नमुने सापडले आहेत. म्हणजे अल्फा, बीटा आणि गॅमा सह इतर व्हेरिएंटपेक्षा भारतात डेल्टा कितीतरी पटीने जास्त आहे, ज्यामुळे लोक एकापेक्षा जास्त वेळा संक्रमित होऊ शकतात. लसीकरणानंतर ही संक्रमित होऊ शकतात.