Corona virus : 'अयोध्येपासून वाराणसीपर्यंत, मक्केपासून मदिनेपर्यंत नुसता हाहाकार'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 08:03 AM2021-05-16T08:03:51+5:302021-05-16T08:04:14+5:30
लोक केंद्र सरकारवर टीका का करीत आहेत? कोरोना संकटात सरकारचे व्यवस्थापन पूर्ण कोसळले आहे. वाराणशीत गंगाकिनारी प्रेतांच्या चिता पेटत आहेत, पण प्रेते जाळायला जागाच उरली नाही म्हणून लोकांनी आप्तांचे मृतदेह गंगेत सोडले
मुंबई - देशात कोरोनाचं मोठं संकट उभारलं असून संपूर्ण देश या संकटाचा सामना करत आहे. गाव-खेड्यापर्यंत कोरोना पोहोचला असून उत्तर प्रदेश अन् बिहारधील परिस्थिती विदारक आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्याऐवजी अनेक प्रेत गंगा नंदीत सोडून दिली जात आहेत. त्यावरुन, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकावर टीका केलीय. तसेच, टीका का करु नये, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या संकटाच्या काळातही भाजपाकडून राजकारणाला प्राधान्य दिले जात असल्याचं सांगत प. बंगालमधील आमदारांचीच सरकारला जास्त काळजी असल्याचे रोखठोक मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.
लोक केंद्र सरकारवर टीका का करीत आहेत? कोरोना संकटात सरकारचे व्यवस्थापन पूर्ण कोसळले आहे. वाराणशीत गंगाकिनारी प्रेतांच्या चिता पेटत आहेत, पण प्रेते जाळायला जागाच उरली नाही म्हणून लोकांनी आप्तांचे मृतदेह गंगेत सोडले. गंगेच्या प्रवाहात सोडलेले शंभरावर मृतदेह पाटण्याच्या गंगाकिनारी मिळाले. अयोध्येत पंतप्रधानांच्या उपस्थितीत राममंदिराचे भूमिपूजन झाले, पण संपूर्ण अयोध्यानगरीत कोरोनाचा हाहाकार माजला असून अयोध्या ऑक्सिजनअभावी गुदमरत, तडफडत आहे. लोकांना इस्पितळे नाहीत. औषधे नाहीत. लस नाही. प्राणवायू नाही. फक्त श्रीरामाचा नारा आहे. त्याने फार तर राजकीय पक्षांना ऑक्सिजन मिळत राहील. त्या ऑक्सिजनवर यापुढे मनुष्य जगणार नाही. अयोध्येपासून वाराणसीपर्यंत, मक्केपासून मदिनेपर्यंत नुसता हाहाकार आहे. त्यावर टीका करायची नाही तर काय करायचे?, अशा शब्दात राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय.
77 आमदारांच्या सुरक्षेसाठी एक्स दर्जाची सुरक्षा
जनता गावागावांत बेहाल अवस्थेत रस्त्यांवर प्राण सोडत असताना केंद्र सरकारने काय गंमत करावी? प. बंगालात भारतीय जनता पक्षाचे 77 आमदार निवडून आले. त्या सगळय़ांना केंद्रीय सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे राजकारणास अंत नाही. ममता बॅनर्जी किती निर्घृण आहेत, त्या भाजपच्या नवनियुक्त आमदारांना ठारच करतील. म्हणून केंद्राने सुरक्षा दिली, असे एक वातावरण निर्माण केले. पश्चिम बंगालमधील भाजपच्या सर्व 77 आमदारांना आता 'एक्स' दर्जाची सुरक्षा पुरवली जाईल. या आमदारांच्या सुरक्षेसाठी 24 तास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडो तैनात असतील.
जर्मन चान्सलरने शिष्टाचार दाखवून दिला
एका सार्वजनिक कार्यक्रमात जर्मन चॅन्सेलर अंजेला मर्केल यांनी वैद्यकीय शास्त्रज्ञांसमोर चालण्यास नकार दिला. त्या प्रसंगाचा एक फोटो आता जगभरात प्रसिद्ध झाला आहे. त्यात चॅन्सेलर अँजेला मार्केल या डॉ. ऊगुर साहिन व त्यांच्या पत्नी ओझलेम तुरेसी यांच्या पाठीमागे चालत आहेत. या जर्मन शास्त्रज्ञ दांपत्याने जर्मनीमध्ये 'कोविड-19'ची लस तयार केली आहे. त्या शास्त्रज्ञांचा सन्मान म्हणून आदराने त्या शास्त्रज्ञांच्या पाठीमागे चालत राहिल्या. राजकारणी सत्ताधीश नाही तर डॉक्टर्स, शास्त्रज्ञ सध्याच्या काळात देश वाचवत आहेत. हा शिष्टाचार जर्मन चॅन्सेलरने दाखवून दिला.
अदर पुनावाला देश सोडून निघून गेले
जर्मन चॅन्सेलर अँजेला मार्केल यांना पत्रकारांनी विचारले, आपण राजशिष्टाचार का मोडताय? यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले, ''Scholar's should lead the nations'' आपल्या राजकारण्यांच्या डोक्यात हे कधीच जाणार नाही. म्हणून चिता पेटत आहेत. कोरोनाग्रस्त प्रेतांना वाली नसल्यामुळे गंगेच्या प्रवाहात प्रेते वाहून येत आहेत आणि कोरोनावर लस बनवणारे डॉ. अदर पुनावाला राजकारण्यांच्या भीतीने देश सोडून तूर्तास निघून गेले. त्यामुळे शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय?