Breaking on Coronavirus Vaccine: कोविडचे विघ्न सरणार; पुण्यात दोन स्वयंसेवकांनी घेतला 'कोव्हिशिल्ड' लसीचा पहिला डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 04:45 PM2020-08-26T16:45:14+5:302020-08-26T17:09:19+5:30
देशातील पहिलीच मानवी चाचणी..
पुणे : सिरम इन्स्टिट्यूटतर्फे भारती हॉस्पिटलमध्ये लसीच्या मानवी चाचणीच्या दुस-्या टप्प्यास सुरुवात झाली. यासाठी सुरुवातीला पाच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी तिघांच्या अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने इतर दोन जणांना लस देण्यात आली. त्यापैकी एक स्वयंसेवक ३२ वर्षीय पुरुष असून, दुसरी व्यक्ती ४७ वर्षीय पुरुष आहे. लस दिल्यानंतर अर्धा तास निरिक्षण करून घरी सोडण्यात आले. दोन्ही स्वयंसेवकांना ०.५ एमएलचा डोस देण्यात आला.
२८ दिवसांनी स्वयंसेवकांना दुसरा डोस दिला जाणार आहे. ९० दिवसांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला जाईल आणि १८० दिवसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावले जाईल. सहा महिन्यांमध्ये लसीच्या यशस्वितेवर शिक्कामोर्तब होऊ शकेल. पुढील सात दिवसांमध्ये २५ जणांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. \
सिरम इन्स्टिट्यूटतर्फे लसींच्या उत्पादनासाठी अॅस्ट्राझेनेका या ब्रिटिश-स्विडिश कंपनीशी करार करण्यात आला आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठातर्फे लस विकसित करण्यात येणार आहे. कोव्हिशिल्ड या लसीची सुरक्षितता, क्षमता यांची चाचणी केली जाणार आहे. ‘केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेतर्फे (सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन) सर्व मान्यता मिळाल्या आहेत. संस्थेकडून ३ ऑगस्ट रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्प्यातील चाचण्यांना मान्यता देण्यात आली. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये चाचणीला सुरुवात झाली.
लसीच्या चाचण्या १७ विविध शहरांमध्ये घेतल्या जाणार आहेत. यामध्ये एम्स दिल्ली, पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेज, पटणा येथील राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्यकेशन अँड रिसर्च, एम्स जोधपूर, गोरखपूरमधील नेहरु हॉस्पिटल, विशाखापट्टणम येथील आंध्र मेडिकल कॉलेज, म्हैसूरमधील जेएसएस अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च आदींचा समावेश आहे.
-----------
कोरोनावरील लसीची मानवी चाचणी भारती विद्यापिठात होणार असल्याचे सोशल मीडियातून समजले. मी हॉस्पिटलशी संपर्क साधला आणि नावनोंदणी केली. हॉस्पिटलमध्ये आल्यावर सर्व प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. आरटीपीसीआर आणि अँटिबॉडी टेस्ट झाल्यानंतर लसीच्या मानवी चाचणीसाठी मी पात्र असल्याचे समजल्यावर आनंद झाला. समाजासाठी मी काहीतरी करू शकतो आहे याचे समाधान वाटते आहे आणि माझे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत...या भावना आहेत ३२ वर्षीय स्वयंसेवकाच्या...अवघ्या जगावर कोरोनाचे संकट कोसळले असताना संकटातून मार्ग काढण्यात आपल्याला खारीचा वाटा उचलता येत असल्याचे समाधान त्याच्या चेह ऱ्यावरून व्यक्त होत होते.