CoronaVirus : दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 14 दिवसांत 1 लाखवरून 3 लाखांवर; तज्ज्ञांनी दिलाय असा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 12:39 PM2022-01-20T12:39:14+5:302022-01-20T12:40:14+5:30
भारतात गेल्या 24 तासांत तब्बल 3,17,532 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान 491 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने तिसरी लाट शांत होऊ लागल्याचे दिसत होते. मात्र गेल्या 24 तासांच्या आकडेवारीवरून कोरोनाच्य तिसऱ्या लाटेचे त्सुनामीत रूपांतर होते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. आज देशभरात कोरोनाचे 3 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या 8 महिन्यांनंतर एका दिवसात एवढे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 14 दिवसांपूर्वी एका दिवसात एक लाख रुग्ण समोर आले होते. आता एका दिवसात 3 लाख रुग्ण येणे, ही धक्कादायक गोष्ट आहे.
भारतात गेल्या 24 तासांत तब्बल 3,17,532 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान 491 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 2,23,990 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 19,24,051 सक्रीय रुग्ण आहेत. तर संक्रमण दर 16.41 टक्के एवढा आहे. आतापर्यंत देशात 9,287 रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्यालाटेसंदर्भात काय म्हणतायत तज्ज्ञ -
जेव्हा कोरोना रुग्ण संख्या कमी होऊ लागली होती, तेव्हा लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडण्यास सुरुवात केली होती. परंतु तरीही तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला होता. इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) मधील एपिडेमियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी 19 जानेवारी रोजीच म्हटले होते, की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत काहीही बोलणे घाईचे आहे. एवढेच नाही, तर मार्चपूर्वी दिलासा मिळणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. एका हिंदी वृत्त संस्थेशी बोलतांना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले होते.