Corona Update : दिल्लीत कोरोनाचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 05:33 PM2022-04-27T17:33:31+5:302022-04-27T17:34:06+5:30
Corona Update : कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध अचानक हटवल्याने, मास्क वापरण्यावर शिथिलता आणि एकाच वेळी शाळा सुरू केल्यामुळे दिल्लीत कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत.
नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 2,927 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1,203 प्रकरणे म्हणजे जवळपास निम्मी प्रकरणे दिल्लीतील आहेत. दिल्लीत गेल्या 24 तासांत एका मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र, ही दिलासादायक बाब आहे की भारतातील एकूण मृत्यूंची संख्या फारशी जास्त नाही. तसेच, यावेळी कोरोनाचे गंभीर रुग्ण सुद्धा कमी आहेत.
निर्बंध हटवल्याने प्रकरणे वाढली
कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध अचानक हटवल्याने, मास्क वापरण्यावर शिथिलता आणि एकाच वेळी शाळा सुरू केल्यामुळे दिल्लीत कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. वाढत्या प्रकरणांनंतरच दिल्ली सरकारला पुन्हा मास्क अनिवार्य करावे लागले आणि 500 रुपयांचा दंडही ठोठावला गेला. दिल्लीसह भारतात ओमायक्रॉन (B.1.1.529) आणि त्याचे सब-व्हेरिएंट BA.2.12.1 मुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
ओमायक्रॉनचा आढळला सब-व्हेरिएंट
दिल्लीतील ILBS म्हणजेच Institute of Liver and Biliary Science मधील Genome Sequencing Lab मध्ये ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट आढळला आहे. नवीन सब-व्हेरिएंट (BA.2.12.1) मधील पॉझिटिव्ह आढळलेले सॅम्पल कोविड-19 जीनोम सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम INSACOG कडे पाठवण्यात आले आहेत.
सॅम्पलची सिक्वेन्सिंग सुरू
दिल्लीमध्ये BA.2.12.1 चा संसर्ग फक्त एकाच ठिकाणी किंवा संपूर्ण शहरात मर्यादित होता की नाही हे आता अधिक जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे तपासले जात आहे. 9 एप्रिलपासून दिल्लीने 25 किंवा त्याहून अधिक सीटी मूल्यांसह सॅम्पल सिक्वेन्सिंग करण्यास सुरुवात केली, तेव्हा नवीन व्हेरिएंट आढळून आले. भारतात 95 टक्के प्रकरणांमध्ये कोरोनाचे फक्त ओमायक्रॉन व्हेरिएंट्स आढळून येत आहेत. आतापर्यंत 8 हून अधिक व्हेरिएंट्स सापडले आहेत आणि ओमायक्रॉनचे आणखी व्हेरिएंट्स पसरण्याची शक्यता आहे.
दिल्लीत अद्याप XE व्हेरिएंट आढळला नाही
दिल्लीत अजून XE व्हेरिएंटचे रुग्ण सापडलेले नाही. WHO च्या मते, हा XE व्हेरिएंट इतर सर्व व्हेरिएंट्सपेक्षा वेगाने पसरू शकतो. दरम्यान, पंतप्रधानांनी आज जी चर्चा केली, त्यामध्ये त्यांनी जीनोम सिक्वेन्सिंगवरही भर दिला, जेणेकरून नवीन व्हेरिएंट्स वेळेत शोधता येतील. मास्क लावल्याने केवळ कोरोनाच नाही तर इतर अनेक आजारांपासूनही बचाव होऊ शकतो आणि दिल्ली एनसीआरच्या प्रदूषित शहरांमध्येही मास्क धूळ आणि धुरापासून संरक्षण करतो, त्यामुळे तज्ज्ञांच्या मते मास्क हा जीवनाचा एक भाग मानला पाहिजे.