Corona Virus : कोरोना प्राणघातक नाही; पण आहे धूर्त, होतो वेगाने संसर्ग : डॉ. अरोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 08:29 AM2021-06-08T08:29:30+5:302021-06-08T08:29:49+5:30
Corona Virus : कोरोनाविरुद्धच्या लढाईत भूमिका पार पाडणाऱ्या जीनोमिक्स कंसोर्टियमची (इनसाकॉग) जबाबदारी मोदी सरकारने डॉ. एन. के. अरोरा यांना सोपविली आहे.
राष्ट्रीय लसीकरण सल्लागार समूहाच्या अध्यक्षांशी संवाद : महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी केंद्र सरकारची दीर्घकालीन योजना
कोरोनाविरुद्धच्या लढाईत भूमिका पार पाडणाऱ्या जीनोमिक्स कंसोर्टियमची (इनसाकॉग) जबाबदारी मोदी सरकारने डॉ. एन. के. अरोरा यांना सोपविली आहे. राष्ट्रीय लसीकरण सल्लागार समूहाचे (एनटीएजीआय) अध्यक्ष आणि वरिष्ठ डॉक्टर अरोरा यांच्याशी ‘लोकमत’चे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांनी विशेष चर्चा केली.
महाराष्ट्रात २०१० मध्ये संसर्ग झाला. त्यानंतर २०१५ मध्ये स्वाइन फ्लू आला आणि आता महाराष्ट्रच सर्वाधिक संसर्ग असलेले राज्य आहे, याचे कारण काय?
- सार्स वन आणि स्वाइन फ्लू हे कोरोनापेक्षा अधिक घातक आजार होते. हा संसर्गही कोरोनासारखा बाहेरून आला. कारण, व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात खूप लोक विदेशातून येतात. त्यामुळे तिथे संसर्ग अधिक झाला. केरळातही खूप लोक बाहेरून येतात; पण येथे बहुतांश लोक आखाती देशातून येतात. त्या देशात संसर्ग कमी होता, म्हणून संसर्ग वाढला नाही. दिल्लीतही बरेच लोक बाहेरून येतात; पण तेव्हा संसर्ग कमी होता. मात्र, यापूर्वी दोन्ही साथींत मृत्यूदर ५० टक्क्यांपर्यंत होता. त्यावेळी मृत्यूदर अधिक होता त्यामुळे संसर्गाचा दर कमी होता; पण कोरोनाच्या काळात हे नेमके उलटे झाले.
असे सांगितले जात होते की, दुसऱ्या लाटेचा परिणाम १०० दिवस राहील; पण आता १२० दिवस होत आले आहेत.
-हे खरे आहे की, ही लाट आता १२० दिवसांच्या आसपास समाप्त होईल. ३० जूनपर्यंत समाप्त होण्याची आशा आहे. ज्या वेगाने संसर्ग झाला तितक्या वेगाने कमीही होतो आहे.
महाराष्ट्रात रुग्णवाढीचा वेग कमी होता आणि आता कमी होण्याचे प्रमाणही कमी आहे. याचे विशेष कारण काय?
- महाराष्ट्रात संसर्ग होण्याचे प्रमाण जवळपास ४ ते ५ टक्के होते. आता ३ टक्क्यांच्या दराने घसरण होत आहे. देशात ६ ते ७ टक्क्यांच्या दराने संसर्ग वाढला होता. तो आता ४ ते ५ टक्क्यांच्या दराने घसरत आहे. देशाच्या आकड्यांप्रमाणेच महाराष्ट्राचेही आकडे आहेत; पण महाराष्ट्रावर आमचे विशेष लक्ष आहे.
याचे विशेष कारण काय आहे?
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूदर दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. एखाद्या राज्यात हा आकडा थोडाफार कमी-जास्त असू शकतो. मात्र, सरासरी हीच आहे. मृत्यूदर कमी असल्याने विषाणू अधिक दिवस शरीरात राहतो आणि अधिकाधिक लोकांना याचा संसर्ग होतो.
म्हणजे हा प्राणघातक नाही?
- कारण, हा धूर्त आहे. खट्याळ, खोडकर विषाणू आहे. हा प्राणघातक नाही. याचा संसर्ग अधिक होतो; पण प्राणहानी कमी आहे. मात्र, सार्स वन आणि स्वाइन फ्लू मारक विषाणू होते. जे याच्याजवळ जात होते, त्याला संसर्ग होत होता. दुबळ्या व्यक्तींना मारतो. ज्यांना पूर्वीपासूनच काही समस्या आहे, अशा लोकांचा मृत्यू झाला. अतिशय कमी प्रकरणे अशी आहेत, जी याला अपवाद आहेत.
याचा अर्थ हा मुख्यत: महाराष्ट्र आणि दिल्लीत आला?
- ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वाहतूक आहे, त्या ठिकाणी याचा परिणाम सर्वात आधी पाहावयास मिळाला. आमच्या अध्ययनातही महाराष्ट्र आणि दिल्ली याची मुख्य ठिकाणे दिसून आली आणि काही प्रमाणात केरळही. केरळात बरेच लोक आखाती देशातूनही येतात. येथे याचा संसर्ग कमी होता. आमच्या अध्ययनात असे दिसून आले की, दिल्लीतही याचा संसर्ग तितका झाला नाही ज्या वेगाने महाराष्ट्रात वाढला, विशेषत: पुणे आणि अमरावतीमध्ये.
महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी काही विशेष योजना तयार होत आहे का?
- मी येथे हे सांगू इच्छितो की, डिसेंबरमध्येच यावर काम सुरू झाले होते. यात पूर्ण देशात दहा विभाग बनविण्यात आले. दहा उच्चस्तरीय लॅब बनविण्यात आल्या. भविष्यात कोणत्याही स्थानिक संसर्गाची लवकर चाचणी करता येईल. त्यानंतर त्या भागात तत्काळ लॉकडाऊन करण्यात येईल. जेणेकरून, संसर्ग वाढू नये. भविष्यातील कोणत्याही प्रकारच्या संसर्गासाठी पुढील २५ वर्षांची योजना तयार करण्यात आली आहे.
असे उपाय महाराष्ट्र आणि दिल्लीत अगोदरच का नाही केले?
- केवळ हास्य.
हे कोण करणार?
- हे सर्व काम इंसोकॉगअंतर्गत केले जाणार आहे.
याचे नेतृत्व थेट आपण करत आहात?
- सरकारने माझ्यावर या टास्क फोर्सची जबाबदारी दिली आहे. इंग्लंडच्या यॉर्कशायरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या उत्परिवर्तनाची चर्चा आहे. फ्रान्स आणि जर्मनीत यावर इशाराही जारी केला आहे. दोन्ही देशांनी इंग्लंडसोबतचे परिवहन थांबविले आहे. आमचे त्यावरही लक्ष आहे; पण आतापर्यंत भारतात असे काही दिसून आले नाही. व्हिएतनाममधूनही असे वृत्त आहे. असे नवे प्रकार येत राहतील. त्यावर आमचे लक्ष असेल. आता कोणताही विषाणू आमच्या नजरेतून सुटू शकणार नाही.
भले तो कितीही बदमाश आणि धूर्त असला तरी...
- होय, आशा तर हीच आहे.
डब्ल्यूएचओचे डॉ. नबैरो यांनी भारताच्या लसीकरण कार्यक्रमाबाबत म्हटले आहे की, अगोदर जास्त जोखीम असलेल्या वर्गाला लस द्यायला हवी होती; पण ते सर्वांसाठी खुले करण्यात आले.
- आम्ही सप्टेंबर २०२० मध्येच ठरविले होते की, लसीकरण ४५ ते ५० पेक्षा अधिक वयोगटासाठी प्रथम करायला हवे. कारण, आमच्याकडे पहिले सहा महिने मोठ्या प्रमाणात डोस असणार नाहीत; पण राज्यांकडून मागणी करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला. आता अनेक राज्यांना हे कळून चुकले आहे.