Corona Vaccine: भारत बायोटेकच्या इंट्रानेझल व्हॅक्सीन, बूस्टर डोसच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला DCGIची मंजूरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 12:58 PM2022-01-05T12:58:14+5:302022-01-05T13:05:15+5:30
Corona vaccine: भारत बायोटेकने कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस घेतलेल्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या तिसऱ्या टप्प्यात 5,000 लोकांवर चाचण्या घेतल्या जातील.
नवी दिल्ली: कोरोना आणि ओमायक्रॉन संकटात आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 'ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया' (DCGI) च्या तज्ञ समितीने हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीला त्यांच्या इंट्रानेझल व्हॅक्सीन (Intranasal Coronavirus Vaccine) आणि बूस्टर डोसच्या फेज-3 चाचण्यांसाठी परवानगी दिली आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ समितीने मंगळवारी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत भारत बायोटेकच्या नाकाद्वारे देण्यात येण्याऱ्या लसीला मंजूरी देण्याचा विचार सुरू होता. दरम्यान बैठकीत नेमका काय निर्णय झाला तो जाहीर केलेला नाही. मात्र नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीला म्हणजेच नेझल वॅक्सिनच्या चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे.
5 हजार लोकांवर ट्रायल
भारत बायोटेकने इंट्रानेझल लस आणि बूस्टर डोसच्या क्लिनिकल चाचण्यांसाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता DCGI ने भारत बायोटेकला मंजुरीसाठी प्रोटोकॉल सादर करण्यास सांगितले आहे. कोरोनाचा बूस्टर डोस आता जगभरातील लोकांना दिले जात आहेत. भारत बायोटेकने कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस घेतलेल्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा प्रस्ताव डीसीजीआयला दिला आहे. या तिसऱ्या टप्प्यात 5,000 लोकांवर क्लिनिकल चाचण्या घेतल्या जातील.
मार्चपर्यंत लस मिळण्याची शक्यता
यामध्ये 50 टक्के कोव्हशील्ड आणि 50 टक्के कोवॅक्सीन घेतलेल्या लोकांचा समावेश असेल. सूत्रांनी सांगितले की, दुसरा डोस आणि तिसरा डोस यामध्ये सहा महिन्यांचे अंतर असू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचण्या वेळेवर झाल्यास भारताला मार्चमध्ये इंट्रानेझल बूस्टर लस मिळण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत कोरोनाविरुद्धची लढाई अधिक मजबूत होईल.