CoronaVirus : कोरोना रुग्णांचा आकडा २ कोटी पार, जगात मृत्यूंच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 11:30 AM2021-05-04T11:30:40+5:302021-05-04T11:31:42+5:30
Coronavirus outbreak in India Latest News Updates: गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे ३ लाख ५७ हजार २२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३ हजार ४४९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २ कोटींचा आकडा पार केला आहे. भारत हा जगातील दुसरा देश आहे, जिथे २ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना संसर्ग वाढीचा वेग इतका आहे की, अवघ्या १७ दिवसांत रुग्णांची संख्या १ कोटींवरून २ कोटींवर गेली आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे ३ लाख ५७ हजार २२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३ हजार ४४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ३ लाख २० हजार २८९ जण कोरोनापासून बरे झाले आहेत. (India reports 3,57,229 new COVID19 cases, 3,20,289 discharges and 3,449 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी २ लाख ८२ हजार ८३३ झाली असून, त्यातील १ कोटी ६६ लाख १३ हजार २९२ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख २२ हजार ४०८ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३४ लाख ४७ हजार १३३ इतकी आहे.
India reports 3,57,229 new COVID19 cases, 3,20,289 discharges and 3,449 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
— ANI (@ANI) May 4, 2021
Total cases: 2,02,82,833
Total recoveries: 1,66,13,292
Death toll: 2,22,408
Active cases: 34,47,133
Total vaccination: 15,89,32,921 pic.twitter.com/Zr1mimN4vH
मृतांच्या आकडेवारीत भारताने मेक्सिकोला मागे टाकले
कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारत मेक्सिकोला मागे टाकून तिसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. आतापर्यंत २ लाख १८ हजार ९४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत ५.९२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ब्राझीलमध्ये ४.०७ लाख लोकांचा मृत्यू आहे. आतापर्यंत मेक्सिकोमध्ये २.१७ लाख मृत्यूची नोंद झाली असून हा चौथ्या क्रमांकावर आहे.
एक दिलासादायक बातमी
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या संकटामध्ये एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही केरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने सह सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
या राज्यांमध्येही रुग्णसंख्येत घट
महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दमण आणि दिव, लक्षद्वीप आणि लडाख या ठिकाणी गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या घटतांना दिसत आहे. मात्र, ही घट अलीकडेच दिसून आली असून त्याआधारे काही बोलणे घाईचे ठरेल, असे लव अग्रवाल म्हणाले. हे चांगले संकेत असून रुग्णसंख्या घटविण्यासाठी या स्थितीत जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही लव अग्रवाल यांनी सांगितले.
(कोरोनातून बरे झाल्यानंतर 'या' टेस्ट करणे महत्वाचे, दुर्लक्ष केल्यास अडचणी वाढू शकतील)
चिंता कायम...
नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरीही १२ राज्यांमध्ये सद्यस्थितीत एक लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर सात राज्यांमध्ये सरासरी ५० हजार ते १ लाख सक्रीय रुग्ण आहेत. २२ राज्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर हा १५ टक्क्यांहून अधिक आहे.