Corona Virus: कोरोनाच्या संकटातून बाहेर येत आहेत हे देश, भारताचा देखील आहे समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 03:18 PM2020-05-05T15:18:01+5:302020-05-05T15:34:04+5:30
अनेक ठिकाणी परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे. अशा देशांमधील अनेक शहरांमध्ये आता एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जगभरातील निम्मी लोकसंख्या घरात कैद आहेत. या दरम्यान काही देशांत लॉकडाऊन शिथिल केले जात आहे. सर्वत्रच कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. असेही काही देश आहेत जे आता हळूहळू कोरोना संकटातून बाहेर येत आहेत. आनंदाची बाब म्हणजे यात भारताचा देखील समावेश आहे. काही देशांमध्ये आता लॉकडाऊन काढले गेले आहेत. अनेक ठिकाणी परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे. अशा देशांमधील अनेक शहरांमध्ये आता एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही.
दक्षिण कोरियाची राजधानी सिओलमध्ये लॉकडाऊन काढले गेले आहे. तेथील शासनाकडून ऑफिस आणि हॉटेल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी काही नियमही लागू करण्यात आले आहेत. मास्क आणि सोशल डिन्स्टसिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
व्हिएतनाममध्ये गेल्या काही दिवसांपासून एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. त्यामुळे तिथले लॉकडाऊन हटवले गेले आहे. शाळा आणि कॉलेजदेखील सुरू झाले असून, विद्यार्थ्यांची स्क्रीनिंगदेखील केली जात आहे. स्क्रीनिंग केल्यानंतर त्यांना प्रवेश देणे बंधनकारक असणार आहे.
मलेशियामध्ये अनेक व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. इराणमध्ये देखील असेच काहीसे चित्र आहे. त्यामुळे तेथील धार्मिक स्थळं आता खुली करण्यात आली आहेत. कोरोनामुळे आता तिथल्या मृत्यूंच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे तेथील मशीद आता पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रमजानसारख्या पवित्र महिन्यात मशीद सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
स्पेनमध्ये ४ मेपासून पब्लिक टान्सपोर्ट सुरू करण्यात आले आहेत. प्रवास करताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. स्पेनमध्ये ४८ दिवस लॉकडाऊन होते. स्पेनमधील आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार १८ मार्चनंतर कोरोना रुग्ण्यांच्या मृत्यूमध्ये घट झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इटलीमध्ये कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले होते. ९ आठवडे इटली लॉकडाऊन होते. आता हळूहळू इटलीची परिस्थितीदेखील पूर्वपदावर येत आहे. तर जर्मनीमध्ये शाळा कॉलेजप्रमाणे सलून आणि काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.