Corona Virus : कोव्हॅक्सिनचा डेटा ‘हू’, अमेरिकेला सादर करणार- डॉ. व्ही. के. पॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 06:47 AM2021-06-12T06:47:17+5:302021-06-12T06:47:44+5:30
Corona Virus: पंतप्रधानांच्या टास्क फोर्सचे (लस) प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले की, ‘जागतिक आरोग्य संघटना लस पासपोर्टचा विषयही हाती घेईल.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि अमेरिकेकडून (यूएसएफडीए) येत असलेल्या वाढत्या दडपणानंतर केंद्र सरकारने कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती आता कोणत्याही दिवशी जाहीर करू, अशी घोषणा शुक्रवारी केली.याबाबतचा डेटा हू, अमेरिकेला लवकरच सादर केला जाणार आहे.
पंतप्रधानांच्या टास्क फोर्सचे (लस) प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले की, ‘जागतिक आरोग्य संघटना लस पासपोर्टचा विषयही हाती घेईल. कोव्हॅक्सिन ६० देशांना पुरविण्यात आली आहे. परंतु, यूएसएफडीएने त्याला मान्यता देण्यास नकार दिला आणि ज्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास होईल की नाही, अशी परिस्थिती त्यामुळे निर्माण झाली आहे.’ जागतिक आरोग्य संघटनाही भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची माहिती मागत आहे.
डॉ. पॉल म्हणाले, ‘प्रत्येक देशाला त्याच्या त्याच्या आवश्यकतांनुसार आणि चाचणीच्या माहितीच्या गरजांनुसार लस स्वीकारायची की नाकारायची याचा हक्क आहे. आम्ही विदेशी लसींच्या चाचण्या घेतो. आम्ही भारत बायोटेकला या विषयाकडे लक्ष द्या, असे सांगितले आहे.’ कोविशिल्ड आणि स्पुतनिक व्ही या लसींनी त्यांच्या टप्पा तिसऱ्या चाचणीची माहिती दिली असताना भारत बायोटेक लिमिटेडने का खुली केली नाही, असे विचारल्यावर डॉ. पॉल यांनी खात्री दिली की, ‘ती कोणत्याही वेळी दिली जाईल.’ डॉ. पॉल म्हणाले, ‘जागतिक आरोग्य संघटना लस पासपोर्टचा विषय हाताळत आहे.’ कोव्हॅक्सिनची सुमारे २५ हजार ८०० लोकांशी संबंधित ‘क्लिनिकल ट्रायल मोड’ परिणामकारकता माहिती अजून सादर झालेली नाही.
६० पेक्षा जास्त देशांत मान्यतेच्या प्रक्रियेत
कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळणे म्हणजे भारतीय लस विकसित करण्यास उत्तेजनही मिळेल. कारण किमान आणखी सहा भारतात विकसित झालेल्या लसी चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. कंपनीने या आधी म्हटले होते की, अमेरिका, ब्राझील आणि हंगेरीसह ६०पेक्षा जास्त देशांत कोव्हॅक्सिन नियामक मान्यतेच्या प्रक्रियेत आहे.