Corona Vaccine Booster Dose: कोरोना लसीच्या बुस्टर डोसनं संसर्ग थांबेल याचा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही, सरकारच्या निर्णयावर तज्ज्ञांचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 10:39 PM2021-12-27T22:39:49+5:302021-12-27T22:45:15+5:30
Corona Vaccine Booster Dose: देशात नववर्षात १० जानेवारीपासून कोरोना विरोधी लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे
Corona Vaccine Booster Dose: देशात नववर्षात १० जानेवारीपासून कोरोना विरोधी लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून बुस्टर डोस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जेणेकरुन नागरिकांच्या शरिरात अँटिबॉडी तयार होऊन संसर्ग रोखण्यात मदत होईल. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. पण मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयावर काही तज्ज्ञांनी सवाल उपस्थित केले असून बुस्टर डोसची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. ज्या देशांमध्ये बु्स्टर डोस दिला गेला आहे अशा देशांमध्येही रुग्णसंख्या काही नियंत्रणात येताना दिसत नाही. त्यामुळे बुस्टर डोसचा काही फायदा होत आहे याचा दावा केला जाऊ शकत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
इंडियन पल्बिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्ष आणि दिल्लीतील एम्सचे कम्युनिटी मेडिसीन डिमार्टमेंटचे डॉ. संजय राय यांनी सरकारच्या बुस्टर डोसच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांच्यामते कोणतंही औषध किंवा लसीचा निर्णय वैद्यकीय पुराव्यांवर आधारित असायला हवा. बुस्टर डोसमुळे नागरिकांच्या शरीरात अँटिबॉडी तयार होतील आणि याचा लोकांना फायदा होईल. कोविड संसर्ग कमी होईल याचा कोणताही वैद्यकीय पुरावा अद्याप दिसून आलेला नाही. दुसरीकडे ज्या देशांमध्ये बुस्टर डोस देण्यात आला आहे. अशा देशांमध्ये कोरोना संक्रमण अद्याप काही नियंत्रणात आल्याचं दिसून येत नाही. याउलट अशा देशांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. बुस्टर डोस दिल्या जात असणाऱ्या देशांमध्ये कोरोनासोबतच ओमायक्रॉन या नव्या व्हेरिअंटचेही रुग्ण सातत्यानं वाढताना दिसत आहेत, असं तज्ज्ञांनी नमूद केलं आहे.
"अनेक देशांमध्ये बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. तर काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बुस्टर डोस देऊनही झाले आहेत. पण याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्याबाबत थोडं वैद्यकिय भूमिकेतूनच पुढील निर्णय घ्यायला हवेत. आपण जर पाहिलं तर यूकेमध्ये जवळपास ३५ टक्के लोकसंख्येला बुस्टर डोस देऊन झाला आहे. तरीही तिथं रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे", असं IPHA चे अध्यक्ष डॉ. संजय राय म्हणाले.
कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले असलेल्यांनाही कोरोनाची बाधा होत असल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांमध्ये नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉनची बाधा होत आहे. बुस्टर डोस घेतल्यानंतरही कोरोनाची बाधा होत असल्याचंही दिसून आलं आहे, असंही डॉ. संजय राय म्हणाले. ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांपैकी १८३ रुग्णांचं आरोग्य मंत्रालयानं विश्लेषण केलं. यात ९१ टक्के रुग्णांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले होते. तर ७० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत.