Corona Virus: पेटीएमच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कंपनीच केली बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 09:25 PM2020-03-04T21:25:49+5:302020-03-04T21:31:29+5:30
Corona Virus: भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 वर पोहचली आहे. तर, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली: चीनमधीलकोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्लीनंतर आता गुरुग्राममध्येही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन पेमेंटची मोठी भारतीय कंपनी असणाऱ्या पेटीएम (PayTm)च्या कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कंपनीने गुरुग्रामधील पेटीएमचं कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुग्रामधील पेटीएम कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोना आजार झाल्यानंतर त्या कार्यलयातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा कंपनीने दिली आहे. त्याचप्रमाणे संसर्ग रोखण्यासाठी ऑफिसमध्ये जंतूनाशक फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील पीटीएम कंपनीनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये देखील ह्युंदाई कंपनीत एक कोरोना झाल्याचा संशयित रुग्ण आढळला होता. यामुळे कंपनीने कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
Paytm employee in Gurgaon has tested positive for coronavirus: Company statement
— Press Trust of India (@PTI_News) March 4, 2020
भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 वर पोहचली आहे. तर, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या आजारामुळे आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना चीनबरोबरच, इटली, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण या देशांत न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेजारच्या बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशांतही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येकाची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही स्थितीत कोरोनाचे रुग्ण बाहेर जाणार नाहीत आणि त्यांना एकांतवासात वा रुग्णालयातच ठेवावे, अशा सूचना आहेत.
रशिया, जर्मनी, सौदी अरेबिया, फ्रान्स, इंडोनेशिया, ब्रिटन युरोपियन युनियन अशा किमान 60 देशांत कोरोना फैलावला आहे. त्यामुळे या सर्व देशांत अनेक निर्बंध घालण्यात आले असून, तेथील जवळपास सर्व सार्वजनिक समारंभ, क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक देशांत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.