Corona Virus : भारतात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार, विमानतळावरच कॅम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 01:21 PM2020-03-04T13:21:54+5:302020-03-04T15:54:48+5:30
Coronavirus : भारतात आतापर्यंत कोरोनाची 25 रुग्ण असल्याची माहिती समोर आलं आहे, हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबद्दल माहिती दिली.
नवी दिल्ली - चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर परदेशात भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची, प्रवाशांची तपासणी केली जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबद्दल माहिती दिली. आतापर्यंत फक्त 12 देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात होती. मात्र, यापुढे जगभरातील देशांमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची प्रवाशांची तपासणी केली जाईल, असे वर्धन यांनी सांगितले.
भारतात आतापर्यंत कोरोनाची 25 रुग्ण असल्याची माहिती समोर आलं आहे. त्यामध्ये 16 नागरिक इटलीतून आलेले आहेत. तर, कोरोनाच्या 3 रुग्णांवर उपचार होऊन ते घरी परतले आहेत. देशातील सर्वच प्रमुख रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले. आतापर्यंत देशातील सर्वच विमानतळांवर मिळून 5,89,000 जणांची तपासणी केली आहे. तर, तर प्रमुख आणि साधारण असलेल्या बंदरांवरही (पोर्ट) 15 हजार प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. तर, मंगळवारपर्यंत नेपाळ सीमारेषेवर 10 लाख लोकांची तपासणी केल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली.
Union Health Minister Harsh Vardhan: We had screened about 5,89,000 at our airports, over 15,000 at minor and major seaports and over 10 lakhs at the border of Nepal, till yesterday. #Coronavirushttps://t.co/0tK8Vm7rfl
— ANI (@ANI) March 4, 2020
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून दिली आहे. जगभरातील तज्ज्ञ सांगत आहेत की, कोरोना व्हायरस (COVID-19) टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, मोठ्या संख्येने लोक एकत्रित केले जाऊ नयेत. यासाठी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे.