‘त्या’ पत्रकारांच्या कुटुंबांना ५ लाख रुपयांचे अर्थसाह्य, ‘लोकमत’चे एस. के. गुप्तांच्या कुटुंबाचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 06:09 AM2021-05-29T06:09:21+5:302021-05-29T06:10:24+5:30
Journalist: कोरोना महामारीसारखे गंभीर संकट आणि दुर्घटनांत जीव गमवावा लागलेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून पाच-पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल.
नवी दिल्ली : कोरोना महामारीसारखे गंभीर संकट आणि दुर्घटनांत जीव गमवावा लागलेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून पाच-पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार पत्रकारांचा मृत्यू कोरोना, रस्ता अपघात किंवा इतर दुर्घटनेत किंवा इतर गंभीर आजाराने झाला असून, त्यात कोरोना संक्रमणामुळे मरण पावलेले ‘लोकमत’चे एस. के. गुप्ता यांचाही समावेश आहे. तीन पत्रकार प्रदीर्घ काळपासून शारीरिक अक्षमतेमुळे अंथरुणाला खिळून असल्यामुळे हे अर्थसाह्य मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण निधीतून दिले जाईल.
मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या पत्रकार कल्याण योजना समितीच्या बैठकीत ही रक्कम मंजूर केली गेली. खरे यांनी सांगितले की, ‘कोरोनाची परिस्थिती पाहता यापुढे दर गुरुवारी समितीची बैठक होईल. अगदी एक प्रकरण असेल तरी त्यावर विचार होईल.’ समितीत सहा पत्रकार व मंत्रालयाचे तीन अधिकारी आहेत. या आधी मंत्रालयाने वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्या ३९ पत्रकारांच्या कुटुंबियांना पाच-पाच लाख रुपयांचे साह्य दिले होते. समितीतील पत्रकार सदस्यांनी मंत्रालयाला अर्थसाह्याची रक्कम वाढवून द्यावी आणि पत्रकारांना आजीवन सीजीएचएस कार्ड दिले जावे, अशी विनंती केली. मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी यावर विचार केला जाईल व त्यासाठी समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन दिले.