सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण, लखनऊमधील प्रकार; ३ ठिकाणी परिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 07:08 PM2021-05-25T19:08:47+5:302021-05-25T19:09:58+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात हाहाकार उडालेला असताना काही दिवसांपूर्वी हवेत कोरोना विषाणूचं अस्तित्व असल्याचा दावा करण्यात आला होता.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात हाहाकार उडालेला असताना काही दिवसांपूर्वी हवेत कोरोना विषाणूचं अस्तित्व असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याला शास्त्रज्ञांनी पूर्णपणे नकार दिला होता. आता लखनऊमधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून कोरोना संदर्भातील चिंता वाढण्याची शक्यता आहे. लखनऊमध्ये सांडपाण्याचं परिक्षण केलं असता त्यात कोरोना विषाणूंचं अस्तित्व असल्याचं समोर आलं आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
पीजीआय मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीएमआर-डब्ल्यूएचओद्वारे देशात सांडपाण्याच्या नमुन्यांचं परिक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली. यात उत्तर प्रदेशातील सांडपाण्याचेही नमून घेण्यात आले. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. यात लखनऊ येथील परिक्षणामध्ये सांडपाण्यात कोरोना विषाणूंचं अस्तित्व आढळून आलं आहे.
लखनऊमध्ये तीन ठिकाणी सांडपाण्याचं परिक्षण
लखनऊमध्ये एकूण तीन ठिकाणी सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यात रुकपूर, घंटाघर आणि तिसरी मोहाल येथील नमून घेण्यात आले होते. यातील रुकपूर येथील सांडपाण्यात कोरोना विषाणूचा अंश सापडला आहे. दरम्यान, ही माहिती अतिशय प्राथमिक स्वरुपातील असून यावर आणखी अभ्यास होणं शिल्लक असल्याचंही डॉ. घोषाल यांनी सांगितलं आहे.
पाण्यातून संसर्ग होऊ शकतो की नाही हा अभ्यासाचा मुद्दा आहे. त्यावर नक्कीच अभ्यास केला जाईल. दरम्यान, उत्तर प्रदेशात कोरोनामुळे मृत्यू झालेले मृतदेह पाण्यात सोडून देण्यात असल्याचीही प्रकरणं पुढे आली होती. त्यातूनच पाण्यात कोरोना विषाणू पसरला गेलाय का याचीही पडताळणी होणं अद्याप शिल्लक आहे. भविष्यात संपूर्ण प्रदेशासाठी एक प्रोजेक्ट स्वरुपात माहिती गोळा केली जाऊ शकते, असंही त्या म्हणाल्या.