Corona virus : खुशखबर ! गेल्या 5 महिन्यातील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या, लसीकरणानंही वेग घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 05:04 PM2021-08-23T17:04:54+5:302021-08-23T17:05:20+5:30
Corona virus : देशातील लसीकरणाचा वेग वाढला असून गेल्या 24 तासांत 44,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,16,80,626 पर्यंत पोहोचली आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होऊ लागला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आल्यानं निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यात, आनंदाची बाब म्हणजे देशातील एकूण लसीकरणाचा आकडा 58.25 कोटीपर्यंत पोहोचला आहे. लसीकरण प्रक्रिया गतीमान झाली असून एक्टीव्ह रुग्णांचा आकडाही कमी झाला आहे.
देशातील लसीकरणाचा वेग वाढला असून गेल्या 24 तासांत 44,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,16,80,626 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, देशातील रिकव्हरी रेट 97.63 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च 2020 नंतर हा सर्वाधिक आकडा आहे. तसेच गेल्या 57 दिवसांत सातत्याने 50 हजारपेक्षा कमी रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. गेल्या 24 तासांत 25,072 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 155 दिवसांतील हा सर्वात कमी रुग्णसंख्या असलेला आकडा आहे. त्यामुळे, कोरोनापासून हा मोठा दिलासा असल्याचं दिसून येतं. देशातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या केवळ 1.03 टक्के एवढी आहे.
कोरोना संक्रमणाचा वेग कमी
ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लाट टोक गाठेल अशी भीती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दलचा अंदाज संस्थेनं अहवालातून वर्तवला आहे. याआधी कानपूर आयआयटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री प्रा. मणींद्र अग्रवाल यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर असल्याचं म्हटलं. लसीकरणाचा वेग वाढल्यानं तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. यापुढे कोरोना संक्रमणाचा वेग कमी कमी होत जाईल, असं अग्रवाल यांनी सांगितलं.
तिसरी लाट येण्याची शक्यता कमी
ऑक्टोबरमध्ये देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १५ हजारांच्या आसपास असेल, असं आयआयटीचं सर्वेक्षण सांगतं. कोरोना रुग्णांच्या संख्येचा अभ्यास करून अग्रवाल यांनी याआधी अनेकदा सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसऱ्या लाटेबद्दलचा त्यांचा अंदाज बऱ्याच अंशी खरा ठरला होता. ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता जवळपास शून्य असल्याचं अग्रवाल यांनी अहवालात म्हटलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेशातील सक्रिय रुग्णांची संख्या अतिशय कमी होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.