Corona Virus Cases In India : 'ही' सामान्य लक्षणं जरी दिसली तरी करून घ्या कोरोना टेस्ट, केंद्राचं राज्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 11:51 PM2021-12-31T23:51:34+5:302021-12-31T23:53:34+5:30
देशातील अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेत चाचण्यांचा वेग वाढविणे आवश्यक असल्याचेही केंद्राने म्हटले आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून इशारा दिला आहे. खोकला, डोकेदुखी आणि घशात खवखव होत असेल तरीही कोरोना चाचणी करावी, असे केंद्राने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि ICMR प्रमुख बलराम भार्गव यांच्या संयुक्त पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, RTPCR चाचणीचा अहवाल मिळण्यास विलंब होऊ शकतो, यामुळे राज्य सरकारांनी रॅपिड अँटीजेन चाचणीचा (RAT) अधिकाधिक वापर करावा.
याशिवाय, देशातील अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेत चाचण्यांचा वेग वाढविणे आवश्यक असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. केंद्राने राज्यांना सांगितले आहे, की ते RTPCR व्यतिरिक्त रॅपिड अँटीजन टेस्ट आणि ICMR मान्यताप्राप्त होम टेस्टिंग किटचाही वापर करू शकता, जेणेकरून कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची वेळेत टेस्ट होईल आणि त्यांना वेळीच आयसोलेट करता येऊ शकेल.
'या' लक्षणांवर लक्ष देणे आवश्यक -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचित केले आहे, की सध्याची वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता, जर कुणालाही खोकला, डोकेदुखी, घशात खवखव, श्वास लागणे, अंगदुखी, चव अथवा वास घेण्यात समस्या, थकवा आणि जुलाब होण्याचा त्रास होत असेल, तर त्याला संशयास्पद प्रकरण मानून, अशा सर्व व्यक्तींची चाचणी करायला हवी आणि चाचणीचा रिझल्ट पाहून त्या सर्वांना ताबडतोब आयसोलेट होण्याचा सल्ला द्यायला हवा. तसेच, अशा सर्व लोकांनी आरोग्य मंत्रालयाच्या आयसोलेशन संदर्भातील दिशानिर्देशांचे पालन करावे.