Corona Virus: चिंताजनक! कोरोना रुग्ण आढळण्याच्या बाबतीत भारत ५ व्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 15:26 IST2020-05-07T15:21:17+5:302020-05-07T15:26:04+5:30
तसेच, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनीतील कोरोनाच्या नव्या रुग्णांची आठवड्याची सरासरी भारतापेक्षा कमी आहे. तर चीनमध्ये १७ एप्रिलनंतर फक्त १२९ बाधित आढळले आहेत.

Corona Virus: चिंताजनक! कोरोना रुग्ण आढळण्याच्या बाबतीत भारत ५ व्या क्रमांकावर
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे जगभरात सुमारे ४०० कोटी लोक घरीच आहेत. तसेच, अनेक देश कोरोनावर मात करण्यासाठी औषध शोधण्याचे काम करत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याच देशाला यश मिळाले नाही. भारतात सुद्घा कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कुठेही कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे भारतासाठी आगामी काळ हा चिंताजनक ठरू शकतो.
जगभरातील देशांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत १५ व्या स्थानी आहे, मात्र रोजच्या रुग्णांच्या बाबतीत ५ सर्वाधिक गंभीर स्थिती असलेल्या देशात आपला समावेश झाला आहे. ३ मे रोजी लॉकडाऊनचे ४० दिवस झाल्यानंतर भारतात सलग तीन दिवस अनुक्रमे ४२३९, ३३१८, ३०७४ रुग्ण आढळले.
जगात फक्त अमेरिका, ब्राझिल, रशिया, पेरू या देशात भारतापेक्षा जास्त रुग्ण आढळले. रोजच्या मृत्यूंच्या बाबतीत भारत जगातील सर्वात वाईट स्थितीच्या ८ देशांत आला आहे. तसेच, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनीतील कोरोनाच्या नव्या रुग्णांची आठवड्याची सरासरी भारतापेक्षा कमी आहे. तर चीनमध्ये १७ एप्रिलनंतर फक्त १२९ बाधित आढळले आहेत.
दरम्यान, भारतात कोरोना बाधितांचा आकडा ५२ हजार २४७ झाला आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊनचे सक्तीने पालन करावे असे, सरकारकडून वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तरीही काही ठिकाणी लॉकडाऊन पाळला जात नसल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांचा थोडासा हलगर्जीपणा देशाला कोरोनाच्या भीषण संकटाकडे नेणारा ठरेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.