Corona Virus: मेडिकल कॉलेजमधील बाधितांची संख्या २८१ वर, ९९ कर्मचाऱ्यांनाही संसर्ग, मात्र निर्बंध लागू होणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 06:23 AM2021-11-28T06:23:38+5:302021-11-28T06:23:54+5:30
Coronavirus in Dharwad Medical Collage : धारवाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीनंतर काेराेनाचा संसर्ग पसरू लागला आहे. आता १८२ विद्यार्थ्यांबरोबरच ९९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कोराेनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बंगळुरू : धारवाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीनंतर काेराेनाचा संसर्ग पसरू लागला आहे. आता १८२ विद्यार्थ्यांबरोबरच ९९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कोराेनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे धारवाडमध्ये वा राज्यात काेणतेही निर्बंध लागू करण्याचा कर्नाटक सरकारचा विचार नसल्याचे राज्याचे आराेग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले.
धारवाडच्या एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. तीन दिवसामध्ये बाधित विद्यार्थी तसेच शिक्षक व अन्य कर्मचारी मिळून २८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्यमंत्री सुधाकर यांनी सांगितले की, सर्व १७८८ विद्यार्थ्यांची काेराेना चाचणी करण्यात आली आहे. काही जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
याशिवाय राज्यातील एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत ३४ आणि इतर ठिकाणच्या १२ जणांना संसर्ग झाला आहे, तरीही निर्बंध लावण्याची गरज सध्या वाटत नाही. लग्न व इतर समारंभ घालून दिलेल्या निकषानुसार हाेत आहेत, असे सुधाकर यांनी सांगितले.
आठ रुग्णवाहिका सज्ज
एसडीएम महाविद्यालयाच्या ५०० मीटरच्या परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय धारवाड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आपात्कालीन परिस्थितीसाठी आठ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सर्व बाधितांना महाविद्यालयातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनाच या ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
कोरोनाचे ८,३१८ नवे रुग्ण, ४६५ मृत्यू
देशात शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ८,३१८ रुग्ण आढळले तर ४६५ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४,६७,९३३ झाली आहे.
ओमिक्राॅन विषाणू घातक नाही -ब्रिटिश शास्त्रज्ञाचे मत
ब्रिटनचे शास्त्रज्ञ प्रा. कॅलम सेम्पल यांनी वेगळे मत मांडताना म्हटले आहे की, ओमिक्रॉन हा फार घातक विषाणू नाही.
या विषाणूमुळे झालेला संसर्ग सध्या वापरात असलेल्या लसींनीही आटोक्यात येऊ शकतो. त्यामुळे ओमिक्रॉनचा बागुलबुवा कोणीही उभा करू नये.