CoronaVirus News : बापरे! देशात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने होतेय वाढ; तज्ञांनी सांगितलं 'हे' कारण, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 08:12 PM2022-04-18T20:12:52+5:302022-04-18T20:22:59+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये सर्वाधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. 17 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात भारतात कोरोनाचे 8,148 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या 7,088 प्रकरणांपेक्षा हे 15 टक्के अधिक आहे. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट येण्याच्या चर्चेला वेग आला आहे. गेल्या आठवड्यात, सक्रिय संसर्गामध्ये देखील 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे गेल्या दोन महिन्यांत दिसलेल्या ट्रेंडच्या उलट आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये सर्वाधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. यूपी आणि हरियाणातील बहुतेक नवीन प्रकरणे गौतम बुद्ध नगर (नोएडा), गाझियाबाद आणि गुरुग्राममधून येत आहेत. हे सर्व जिल्हे दिल्लीला लागून आहेत. यावेळी मुलांमध्येही संसर्ग दिसून येत आहे ही चिंतेची बाब आहे. अनेक महिन्यांनंतर मुले शाळेत परतली. त्यानंतर आता अनेक मुले पॉझिटिव्ह आढळून आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान निष्काळजीपणा हा घातक ठरू शकतो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या चौथ्या लाटेची ही सुरुवात आहे असे म्हणणे घाईचे आहे. आरोग्य अर्थशास्त्रज्ञ रिजो एम. जॉन यांनी "नवीन लाटेच्या सुरुवातीबद्दल काहीही बोलणे योग्य नाही. नवीन प्रकरणे वाढत आहेत की नाही हे मी दोन दिवस पाहीन" असं म्हटलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी-इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव म्हणाल्या, "नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे लोकांची आता मास्क घालण्याची सवय मोडली आहे. याशिवाय मोठ्या संख्येने लोक एकत्र येत आहेत त्यामुळे गर्दी होत आहे."
आपण गर्दी टाळली पाहिजे, असे त्या म्हणाला. आपण पुन्हा एकदा कोरोनाच्या नियमांचे पालन करणे सुरू केले पाहिजे. जिथे जाल तिथे मास्क घाला. आणखी एका शास्त्रज्ञाने सांगितले की, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे हे कोरोनाचे नवीन रुग्ण वाढण्याचे कारण आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा वेग मंदावल्यामुळे अनेक राज्यांत निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. पण आता पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.