corona virus : मजूरांकडून रेल्वेभाडे नाही घेणार, प्रत्येकी १ हजार रुपये मदत देणार; या राज्याने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 03:00 PM2020-05-04T15:00:18+5:302020-05-04T15:07:13+5:30
लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर केंद्र सरकारने विविध राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची परवानगी दिली आहे.
पाटणा - गेल्या दीड महिन्यापासून देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर विविध भागात अडकून पडले होते. दरम्यान, लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर केंद्र सरकारने विविध राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची परवानगी दिली आहे. तसेच या मजुरांसाठी श्रमिक स्पेशल गाड्या चालवण्यात येत आहेत. मात्र या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी केंद्र सरकारकडून भाडेवसुली करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. पण परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
‘’परराज्यात अडकलेल्या बिहारी लोकांना परत पाठवण्यासाठी केंद्र सरकारला दिलेल्या प्रस्तावाचा विकार केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. परराज्यातून श्रमिक स्पेशल गाड्यांमधून येणाऱ्या मजुरांकडून कुठल्याही प्रकारचे भाडे वसूल केले जाणार नाही, या मजुरांना सुरुवातीला क्वारेंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर या सर्व मजुरांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत म्हणून दिले जातील,’’ असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले.
ही रक्कम बिहार सरकारकडून दिली जाईल. या योजनेंतर्गत बिहार सरकारने १९ लाख मजुरांना याआधीही प्रत्येकी एक हजार रुपये दिले गेले होते. दरम्यान, बाहेरून आलेल्या सर्व प्रवासी मजुरांना २१ दिवसांपर्यंत क्वारेंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल, असे नितीश कुमार यांनी सांगितले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus: …महाराष्ट्र सरकारच्या त्या चुकीमुळे आमच्या अडचणी वाढल्या, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
CoronaVirus: सूट मिळताच कोरोनाचा संसर्ग वाढला, तीन दिवसांत आढळले साडेसात हजाराहून अधिक रुग्ण
CoronaVirus News: कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९२ हजार गुन्हे दाखल
बिहारमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ५०३ रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ददेशात आतापर्यंत कोरोनाचे ४२ हजार ५३३ रुग्ण सापडले आहेत. पैकी ११ हजार ७०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात सध्याच्या घडीला कोरोनाचे २९ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. १ मे ते ३ मे या अवघ्या तीन दिवसांच्या काळात देशात कोरोनाचे तब्बल साडे सात हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.