जानेवारीत 87 हजार रुग्ण कमी झाले, पण फेब्रुवारीत कोरोनाबाधित 1.65 लाखांवर
By महेश गलांडे | Published: March 1, 2021 11:42 AM2021-03-01T11:42:19+5:302021-03-01T11:42:46+5:30
रविवारी देशात 15,614 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, 11,291 लोक बरे झाले असून 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, महाराष्ट्रासह अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या 5 दिवसांत सलग 15 हजारांपेक्षा अधिक रुग्ण पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. तसेच, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. देशभरात 31 डिसेंबर रोजी 2 लाख 52 हजार 701 रुग्ण एक्टीव्ह होते, पण 31 जानेवारी रोजी ही रुग्णसंख्या घटून 1 लाख 65 हजार 715 पर्यंत पोहोचली होती. रुग्णसंख्या कमी होण्याची हीच सरासरी फेब्रुवारी महिन्यात राहिली असती तर हा आकडा 80 हजारांपर्यंत आला असता.
रविवारी देशात 15,614 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, 11,291 लोक बरे झाले असून 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 1.07 कोटीपेक्षा जास्त लोक कोरोनामुक्त झाले असून 1 लाख 57 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत देशभरात 1.65 लाक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशातील 6 राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढला आहे.
महाराष्ट्रात रविवारी 8,293 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, 3753 रुग्ण बरे झाले असून 62 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आत्तापर्यंत 21 लाख 55 हजार 70 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी, 20 लाख 24 हजार 704 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 52 हजार 154 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. सद्यस्थितीत 77 हजार 8 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
महाराष्ट्रानंतर केरळमध्येही रुग्णांची संख्या वाढली असून रविवारी 3254 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, 4333 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, 15 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये आत्तापर्यंत 10 लाख 59 हजार 404 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामध्ये 10 लाख 5 हजार 497 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 49 हजार 416 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मध्य प्रदेशमध्ये रविवारी 363 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 243 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजमित्तीस 2,785 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यानंतर, दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून रविवारी 197 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच, 168 रुग्ण बरे झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत दिल्लीत 1335 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीनंतर गुजरातमध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढत असून रविवारी 407 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आहे. गुजरातमध्ये सद्यस्थितीत 2363 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये रविवारी 156 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले, येथील राज्यात सद्यस्थितीत 1308 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.