पुन्हा घाबरवतोय कोरोना! 13 राज्यांमध्ये सापडला 'हा' नवीन सब-व्हेरिएंट; जाणून घ्या, सर्वकाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 02:36 PM2023-04-12T14:36:49+5:302023-04-12T14:37:43+5:30
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 7,830 नवीन रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. अनेक महिन्यांपासून कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत होते, मात्र गेल्या काही आठवड्यांपासून संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 7,830 नवीन रुग्ण आढळले आहेत. 233 दिवसांनी हा प्रकार घडला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 7,946 रुग्ण आढळले होते. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मंगळवारी देशभरात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच वेळी, संसर्ग दर देखील 3.65 टक्क्यांवर आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, एक भयावह गोष्ट देखील समोर आली आहे की ओमायक्रॉनच्या XBB.1.16 या सब व्हेरिएंटमध्ये म्यूटेशन झाले आहे. आता आणखी एक नवीन सब-व्हेरिएंट XBB.1.16.1 समोर आला आहे. भारतातील कोरोना प्रकरणांच्या जीनोम सिक्वेन्सिंग (INSACOG) करण्यात आले. त्यात म्हटले आहे की म्यूटेटेड सब व्हेरिएंट XBB.1.16.1 ची 234 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. INSACOG च्या मते, दिल्ली, गुजरात आणि हरियाणासह 13 राज्यांमध्ये या नवीन सब व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
प्रत्येक व्हायरस बदलतो. म्यूटेशनमुळे त्याची नवीन रूपे समोर येतात. Omicron चे sub-variant XBB.1.16 हे भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. XBB.1.16.1 सब-व्हेरिएंट XBB.1.16 चं म्यूटेटेड व्हर्जन आहे. INSACOG नुसार, XBB.1.16 हा सब-व्हेरिएंट देशातील 22 राज्यांमधील 1 हजार 744 नमुन्यांमध्ये आढळून आला आहे.
XBB.1.16.1 किती धोकादायक?
आतापर्यंत, XBB.1.16.1 अधिक गंभीर रोग होऊ शकतो किंवा नाही याचा कोणताही पुरावा नाही. गेल्या वर्षी, Omicron चे sub-variant XBB बाहेर आले. यामध्ये उत्परिवर्तनामुळे XBB.1.16 आणि XBB.1.16.1 बाहेर आले आहेत. भारतातच, Omicron चे 400 हून सब-व्हेरिएंट समोर आले आहेत. त्यापैकी 90 टक्के XBB आहेत.
'ही' आहेत लक्षणं
INSACOG ने सांगितले की, सध्या भारतात आलेल्या कोरोनाच्या सर्व प्रकरणांपैकी 38.2 टक्के प्रकरणे XBB.1.16 सब-व्हेरिएंटची आहेत. XBB.1.16 ची लक्षणं देखील Omicron च्या उर्वरित सब-व्हेरिएंट सारखीच आहेत. ताप, सर्दी-खोकला, नाक वाहणे, डोकेदुखी, अंगदुखी, ओटीपोटात दुखणे आणि अतिसार यांचाही समावेश होतो. मात्र, ती फारशी गंभीर नाही, ही दिलासादायक बाब आहे. बहुतेक रुग्णांवर घरी उपचार केले जाऊ शकतात आणि केवळ गंभीर स्थितीतच रुग्णालयात जावे लागते.
नवी लाट येणार?
कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले असताना आता पुन्हा नवी लाट येणार की काय अशी भीतीही वाढली आहे. मात्र, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. सध्या घाबरण्याची गरज नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृतांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत नसल्याचे त्यांचे मत आहे.
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ. धीरेन गुप्ता यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, XBB.1.16 सब-व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यांनी सांगितले की हा सब-व्हेरिएंट रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देण्यास सक्षम आहे. डॉ. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला असेल किंवा लसीकरण करण्यात आले असेल, तरीही तुम्हाला या सब-व्हेरिएंट संसर्ग होऊ शकतो.
कशी काळजी घ्यायची?
आता घाबरण्याची गरज नसली तरी खबरदारी घ्यायला हवी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत आहे. याशिवाय, तुम्ही अद्याप कोविड लसीचा बूस्टर डोस घेतला नसेल, तर तोही घ्यावा. फेस मास्क देखील वापरला पाहिजे. यासोबतच जर तुम्हाला सर्दी-खोकला किंवा सर्दी व्यतिरिक्त फ्लूसारखी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"